Friday, August 14, 2026
Home Breaking News चंद्रपुर मध्ये ऑनलाईन फसवणुकीचे जाळे उघड ! ३०० बँक खाती ; ४००...

चंद्रपुर मध्ये ऑनलाईन फसवणुकीचे जाळे उघड ! ३०० बँक खाती ; ४०० व्यवहार अन् कोट्यवधींचा घोटाळा. 📍चंद्रपुरात देशातील ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचे मोठे जाळे उघडकीस.

0
21

चंद्रपुर मध्ये ऑनलाईन फसवणुकीचे जाळे उघड ! ३०० बँक खाती ; ४०० व्यवहार अन् कोट्यवधींचा घोटाळा.

📍चंद्रपुरात देशातील ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचे मोठे जाळे उघडकीस.

सुकदर्शन वृतांत
चंद्रपूर : देशभरातील ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या तक्रारींच्या तपासातून चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे ३०० संशयित बँक खाती आणि एटीएमद्वारे झालेल्या सुमारे ४०० व्यवहारांचे धागेदोरे समोर आले असून, या प्रकरणाचा स्थानिक सायबर गुन्हे शाखेकडून सखोल तपास सुरू आहे.
संशयित खात्यांमधून कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले असून,चंद्रपूर, ब्रह्मपुरी,बल्लारपूर आणि भद्रावती येथे प्रत्येकी एक अशा चार गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
देशभरातून १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनवर प्राप्त झालेल्या तक्रारी इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) मार्फत राज्य सायबर समन्वय केंद्राकडे पाठविण्यात आल्या. त्यानंतर संशयास्पद व्यवहारांचे विश्लेषण करताना चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक बँक खात्यांचा वापर आर्थिक फसवणुकीसाठी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे.

संशयित बँक खात्यांची तपासणी : –

सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांनी संशयित खात्यांच्या व्यवहारांची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्याचे समोर आले. प्राथमिक तपासानुसार भद्रावती आणि बल्लारपूर येथील काही खात्यांमधून जवळपास एक कोटी रुपयांची रक्कम काढण्यात आली असून, चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी येथील विविध एटीएममधूनही मोठ्या प्रमाणात रोख रक्कम काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.

तपासाची व्याप्ती वाढणार : –

या सर्व व्यवहारांचा स्रोत, लाभार्थी आणि आर्थिक व्यवहारांचे नेटवर्क शोधण्यासाठी सायबर पथकाने तपासाची व्याप्ती वाढविली आहे. संबंधित खात्यांची कागदपत्रे, केवायसी माहिती, सीसीटीव्ही चित्रफिती, एटीएम व्यवहारांचे तांत्रिक तपशील तसेच डिजिटल पुरावे संकलित केले जात आहेत. विविध बँका आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या समन्वयाने संपूर्ण आर्थिक साखळीचा मागोवा घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांनी दिली.

तक्रार नोंदविण्याचे आवाहन : – 

सायबर गुन्हे शाखेने नागरिकांना आपले बँक खाते, एटीएम कार्ड, ओटीपी, यूपीआय पिन किंवा इतर बँकिंग माहिती कोणालाही देऊ नये, तसेच संशयास्पद व्यवहार आढळल्यास तातडीने १९३० या सायबर हेल्पलाइनवर किंवा जवळच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन केले आहे.

” म्युल अकाउंट ” म्हणजे काय ?

सायबर फसवणुकीतील आरोपी स्वतःच्या खात्याऐवजी इतरांच्या बँक खात्यांचा वापर करतात. अशा खात्यांना ” म्युल अकाउंट ” म्हटले जाते. काही जण कमिशनच्या मोबदल्यात आपले खाते वापरण्यास देतात, तर काहींना त्यांच्या खात्याचा गैरवापर होत असल्याची कल्पनाही नसते.
फसवणुकीची रक्कम अनेक खात्यांत वेगाने वळवून नंतर एटीएम किंवा डिजिटल माध्यमांतून काढली जाते. त्यामुळे पैशांचा मूळ स्रोत शोधणे तपास यंत्रणांसाठी अधिक गुंतागुंतीचे ठरते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!