Friday, August 14, 2026
Home Breaking News खोट्या कागदपत्रांद्वारे आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांवर कारवाईची धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेची मागणी.

खोट्या कागदपत्रांद्वारे आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांवर कारवाईची धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेची मागणी.

0
25

खोट्या कागदपत्रांद्वारे आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांवर कारवाईची धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेची मागणी.

सुकदर्शन वृतांत 
गडचिरोली : धनगर अधिकारी-कर्मचारी संघटनेच्या वतीने सोमवारी (दि. 3 ऑगस्ट 2026 ) जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली येथे निवेदन सादर करून खोटी कागदपत्रे सादर करून शासन, जात पडताळणी समिती व न्यायालयाची दिशाभूल करणाऱ्या संबंधित व्यक्तींवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, काही व्यक्ती “झाडे/झाडया” या नावातील नामसाधर्म्याचा गैरफायदा घेत धनगर (भटक्या जमाती-क) समाजाच्या आरक्षणाचा लाभ मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. शासन निर्णयानुसार भटक्या जमाती-क (NT-C) प्रवर्गातील आरक्षण हे धनगर व त्यांच्या तत्सम जातींसाठी लागू असताना, तेलंगणा राज्यातून स्थलांतरित झालेल्या झाडे/झाडया समाजातील काही व्यक्ती महसूल विभागाची दिशाभूल करून NT-C प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळवत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
धनगर समाजातील झाडे आणि गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यातील झाडे, झाडया अथवा झाडे कुणबी समाज यांच्यात कोणतेही जातीय किंवा सामाजिक साम्य नसल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. तरीही अपूर्ण अथवा चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्याचे प्रयत्न होत असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.
अलीकडील न्यायालयीन निर्णयांच्या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकरणांमध्ये रिव्ह्यू पिटिशन किंवा सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करावे, तसेच शासन, जात पडताळणी समिती आणि न्यायालयाची दिशाभूल झाली आहे का, याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
धनगर समाजाच्या हक्काच्या आरक्षणात कोणत्याही प्रकारची घुसखोरी होऊ नये, खोट्या कागदपत्रांच्या आधारे लाभ घेणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत आणि भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संघटनेने केली.
यावेळी धनगर अधिकारी – कर्मचारी संघटनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी व समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!