Home Gadchiroli हक्कांसाठी नर्सेसनी संघटित राहणे काळाची गरज गडचिरोली जिल्हा नर्सेस संघटनेच्या आमसभेत मायाताई...
हक्कांसाठी नर्सेसनी संघटित राहणे काळाची गरज
गडचिरोली जिल्हा नर्सेस संघटनेच्या आमसभेत मायाताई शिरसाट यांचे आवाहन
सुकदर्शन वृत्तांत | गडचिरोली
गडचिरोली : जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासी भागात नर्सेस भगिनी अहोरात्र आरोग्यसेवा बजावत आहेत. खेड्यापाड्यात तसेच घरोघरी जाऊन रुग्णांची काळजी घेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्या करीत आहेत. आरोग्य विभागातील विविध जबाबदाऱ्या पार पाडताना परिचारिकांवर अतिरिक्त कामांचा भार पडत असून, त्यांच्या वेतनवाढी, नियमित भत्ते व मानधनासह विविध प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
या पार्श्वभूमीवर आपल्या हक्कांसाठी आणि अधिकारांसाठी नर्सेसनी संघटित राहणे ही काळाची गरज आहे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्या माजी जिल्हाध्यक्ष तथा मार्गदर्शक मायाताई शिरसाट यांनी केले.
पंचायत समिती सभागृह, गडचिरोली येथे जिल्हा नर्सेस संघटनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र नर्सेस संघटनेच्या कार्याध्यक्ष कविताताई बोदरे होत्या, तर उद्घाटक म्हणून माजी ग्रामविकास अधिकारी रतन शेंडे उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य कार्यकारिणी सरचिटणीस रंजनाताई कोहपरे, नर्सेस संघटनेच्या मार्गदर्शक मायाताई शिरसाट, ग्रामविकास अधिकारी कविश्वर बनपुरकर, ग्रामसेवक संघटनेचे सचिव खुशाल नेवारे, सामाजिक कार्यकर्ते प्रा. मुनिश्वर बोरकर, चक्रधर मेश्राम, अमृता नागदेवते, सुलोचना शिरभाते आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना मायाताई शिरसाट यांनी सांगितले की, ग्रामीण व दुर्गम भागात कार्यरत नर्सेस विविध अडचणींचा सामना करत आरोग्यसेवा देत आहेत. त्यांच्या प्रश्नांसाठी संघटितपणे आवाज उठविणे आवश्यक असून, संघटनेच्या माध्यमातून एकत्रित लढा दिल्यास समस्या सोडविण्यासाठी निश्चितच पाठपुरावा करता येईल.
उद्घाटक रतनभाऊ शेंडे यांनी नर्सेसच्या कार्याचे कौतुक करताना खेड्यापाड्यात काम करणाऱ्या परिचारिका अन्यायाविरोधात ठामपणे उभ्या राहतात, असे नमूद केले. संघटित शक्तीच्या माध्यमातून आपल्या न्याय्य मागण्यांसाठी प्रभावीपणे पाठपुरावा करता येतो, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी कविताताई बोदरे,कविश्वर बनपुरकर, प्रा.मुनिश्वर बोरकर,चक्रधर मेश्राम आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात सेवानिवृत्त परिचारिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन नर्सेस संघटनेच्या सचिव शर्मिला जनबंधु यांनी केले.कार्यक्रमास गडचिरोली जिल्ह्यातील नर्सेस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
error: Content is protected !!