Home Chandrapur चंद्रपूर मध्ये रजिस्ट्रीसाठी 4 हजारांची लाच घेताना दुय्यम निबंधक व ऑपरेटर ACB...
चंद्रपूर मध्ये रजिस्ट्रीसाठी 4 हजारांची लाच घेताना दुय्यम निबंधक व ऑपरेटर ACB च्या जाळ्यात..!
सुकदर्शन वृतांत
चंद्रपूर : शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचाराचा आणखी एक प्रकार उघडकीस आला असून मालमत्तेच्या दस्तऐवजाची नोंदणी करून देण्यासाठी 4 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी दुय्यम निबंधक श्रेणी-1 आणि त्याच्या ऑपरेटर विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवार 16 जून रोजी धडक कारवाई केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार,मोहन चंद्रकांत शेटट्टीवार, दुय्यम निबंधक श्रेणी -1, मुद्रांक व नोंदणी विभाग,चंद्रपूर यांनी तक्रारदाराच्या पक्षकारांच्या दोन मालमत्ता दस्तऐवजांच्या नोंदणीसाठी प्रत्येकी 2 हजार रुपये, असे एकूण 4 हजार रुपयांची लाच मागितली होती.
ही रक्कम त्यांनी आपल्या डाटा ऑपरेटर मार्फत स्वीकारण्याची व्यवस्था केली होती. भद्रावती तालुक्यातील मालमत्तेच्या नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर संबंधित दस्तऐवजांची नोंदणी करण्यात आली. मात्र, या कामाच्या मोबदल्यात लाचेची मागणी करण्यात आल्याने तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर कार्यालय गाठून तक्रार दाखल केली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने मंगळवारी (16) सापळा रचला. पंचासमक्ष करण्यात आलेल्या कारवाईत दुय्यम निबंधक शेटट्टीवार यांनी त्यांच्या ऑपरेटरमार्फत 4 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीने तात्काळ कारवाई करत संबंधितांना ताब्यात घेतले.
प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.दिगंबर प्रधान आणि अपर पोलीस अधीक्षक माधुरी बावीस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार, पोलीस निरीक्षक सचिन धर्मेजवार तसेच एसीबीच्या विशेष पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी अथवा त्यांच्या वतीने काम करणाऱ्या एजंटांकडून कायदेशीर शुल्का व्यतिरिक्त लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन एसीबीने केले आहे.
error: Content is protected !!