Wednesday, October 7, 2026
Home Breaking News गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई येथील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू प्रकरण 📍काँग्रेस जिल्हाध्यक्ष...

गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई येथील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू प्रकरण 📍काँग्रेस जिल्हाध्यक्ष विश्वजित कोवासे यांना पोलिसांनी अटक ; दोन दिवसाची पोलीस कोठडी

गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई येथील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू प्रकरण

📍काँग्रेस जिल्हाध्यक्ष विश्वजित कोवासे यांना पोलिसांनी अटक ; दोन दिवसाची पोलीस कोठडी

सुकदर्शन वृतांत 
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाला सव्वा महिन्यानंतर नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील आरोपी आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा संस्थेचे सचिव विश्वजित कोवासे यांना पोलिसांनी गुरुवारी (१८ सप्टेंबर) रात्री त्यांच्या राहत्या घरातून अटक केली.
न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. संस्थाध्यक्ष तथा माजी खासदार मारोतराव कोवासे हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे नागपूर येथील खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.जपतलाई येथील आश्रमशाळेत १० ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास सहा विद्यार्थिनींना झोपेत असतानाच सर्पदंश झाला होता.
या घटनेत दीपिका ऐतवा लकडा,सुष्मिता सरोजीत मंडल आणि अनु गजुराम कोरेती या तीन विद्यार्थिनींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.
घटनेनंतर पोलिसांनी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक प्रशांत विलासराव ताटपल्लीवार,महिला अधीक्षिका भाग्यश्री ज्ञानेश्वर चिल्लमवार आणि वसतिगृह अधीक्षक भास्कर रामचंद्र भोयर यांच्याविरुद्ध ११ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला. निष्काळजीपणामुळे मृत्यू,निष्काळजी कृत्यामुळे गंभीर दुखापत, सामूहिक जबाबदारी तसेच बालकावर क्रूरता,अत्याचार किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याच्या तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आली.
तपासादरम्यान पोलिसांनी संस्थाध्यक्ष मारोतराव कोवासे आणि संस्था सचिव विश्वजित कोवासे यांचाही आरोपी म्हणून समावेश केला. त्यानंतर संस्थेची मान्यताही रद्द करण्यात आली.
या प्रकरणात मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार आणि वसतिगृह अधीक्षक भास्कर भोयर यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती.कोवासे पिता-पुत्रांनी अटकेपासून बचाव करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती.उच्च न्यायालयातही जामिनासाठी प्रयत्न करण्यात आले.मात्र त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.
त्यानंतर विश्वजित कोवासे यांना अखेर पोलिसांनी अटक केली.काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदावर असलेल्या विश्वजित कोवासे यांच्या अटकेमुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणातील पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
error: Content is protected !!