Home Crime 11 वर्षांपासून खुनाच्या गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेल्या नक्षल समर्थक आरोपीस गडचिरोली पोलीसांनी घेतले...
11 वर्षांपासून खुनाच्या गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेल्या नक्षल समर्थक आरोपीस गडचिरोली पोलीसांनी घेतले ताब्यात.
📍खुन,खुनाचा प्रयत्न,शासकिय सेवकावर हल्ला याप्रकारच्या विविध गुन्ह्रांमध्ये आरोपीचा होता प्रत्यक्ष सहभाग.
सुकदर्शन वृतांत
गडचिरोली : (दि.19/06/2026)गडचिरोली जिल्ह्रातील माओवाद जवळजवळ संपूष्टात आला असून, पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री.एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस दलाने माओवादविरोधी अभियानांतर्गत आणखी एक महत्त्वपूर्ण यश संपादन करत मागील 11 वर्षांपासून फरार असलेल्या नक्षल समर्थक आरोपीस दिनांक 17 जून 2026 रोजी ताब्यात घेतले आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की, नक्षल समर्थक आरोपी नामे बापू व्यंकटी जनगम रा. नडीकुडा हा पोलीसांच्या अभिलेखावरील जी.आर.डी. (ग्राम रक्षक दल) या यादीमध्ये समाविष्ट असलेला आरोपी असून, तो माओवाद्यांना मदत करणाया जनमिलिशिया संघटनेशी संबंधित असल्याची नोंद आहे.
सदर आरोपी हा दीर्घकाळ पोलीसांना चकवा देत फरार राहत असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी सातत्याने गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने विशेष मोहिमा राबविण्यात येत होत्या.अखेर दिनांक,17/06/2026 रोजी पोलीस स्टेशन असरल्लीच्या पथकास गोपनीय माहिती प्राप्त झाली की, मागील अनेक वर्षांपासून फरार असलेला आरोपी नामे बापू व्यंकटी जनगम, रा.नडीकुडा हा आपल्या कुटूंबाला भेटण्यासाठी गावात आला आहे.
अशा प्राप्त माहितीच्या आधारे पोलीसांनी तात्काळ नियोजनबद्ध कारवाई करून मौजा नडीकुडा गावास घेराव घालुन गावात शोध मोहीम राबविली. यादरम्यान पोलीस पथकास आरोपी हा नडीकुडा येथील शेतशिवार परिसरात आढळून आला असता पोलीसांनी अत्यंत शिताफीने कारवाई करून त्यास ताब्यात घेऊन अटक केली आहे.
आरोपी बापू व्यंकटी जनगम रा. नडीकुडा हा विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला आरोपी असून, त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन असरअल्ली येथे विविध गुन्हे दाखल आहेत.
1) अप क्र. 10/2007 कलम 304, 34 भादंवि.
2) अप क्र. 13/2011 कलम 353, 332, 427, 143, 147, 149 भादंवि.
3) अप. क्र. 42/2011 कलम 307, 353, 379, 427, 143,147,149 भादंवि.
4) अप क्र. 03/2015 कलम 353, 337, 338, 34 भादंवि.
5) अप. क्र. 06/2015 कलम 302, 34 भादंवि. यांचा समावेश आहे.
यामधील अप.क्र. 06/2015 कलम 302,34 भादंवि. या गुन्ह्रामध्ये गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी गेल्या 11 वर्षांपासून फरार होता. सदर गुन्ह्रातील सह-आरोपीला मा.सत्र न्यायालय, गडचिरोली यांनी यापुर्वीच जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे.
सदर अत्यंत गंभीर अशा विविध गुन्ह्रातील पाहिजे असलेल्या नक्षल समर्थक आरोपीचा शोध घेण्यासाठी गडचिरोली पोलीसांकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत होते. तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती संकलन तसेच स्थानिक स्तरावरील माहितीच्या आधारे आरोपीच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत होते.अखेर दीर्घकाळ फरार असलेल्या व विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेल्या आरोपीस अटक करण्यात गडचिरोली पोलीसांना यश आले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीस मा. न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून, मा. न्यायालयाच्या आदेशान्वये त्यास न्यायालयीन कोठडीत रवाना करण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. हर्षवर्धन बी. जे., पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, सिरोंचा श्री. संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे असरअल्लीचे प्रभारी अधिकारी सपोनि. योगिराज जाधव, पोउपनि.प्रसाद पवार व पोलीस अंमलदार यांनी पार पाडली.
error: Content is protected !!