Home Breaking News एटापल्लीतील शिक्षण व्यवस्थेचा विदारक चेहरा समोर ; कुठे वाघाच्या दहशतीत २ कि.मी...
एटापल्लीतील शिक्षण व्यवस्थेचा विदारक चेहरा समोर ; कुठे वाघाच्या दहशतीत २ कि.मी जंगलवाट ; मंत्री – अधिकाऱ्यांच्या मुलांना अशा शाळेत पाठवणार का ?
कोसालेंगा ते डुम्मे पर्यंत मूलभूत सुविधांचा अभाव ; अभिजित दिपके यांच्या गडचिरोली दौऱ्यात धक्कादायक वास्तव समोर
सुकदर्शन वृत्तांत
एटापल्ली : दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, एटापल्ली तालुक्यातील कोसालेंगा आणि डुम्मे येथील शाळांची परिस्थिती पाहता या योजनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कुठे शाळा गावात असून शिक्षकांच्या अभावामुळे विद्यार्थिनींना वाघाच्या दहशतीतून दोन किलोमीटर जंगलवाट तुडवत दुसऱ्या गावातील शाळेत जावे लागत आहे, तर कुठे जर्जर इमारत, अपुऱ्या वर्गखोल्या, स्वच्छतागृहाचा प्रश्न आणि शिक्षकांची कमतरता अशी परिस्थिती आहे.सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी गडचिरोली दौऱ्यादरम्यान एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम कोसालेंगा आणि डुम्मे येथील शाळांना भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली.
या पाहणीत ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या शैक्षणिक समस्यांचे वास्तव समोर आले.कोसालेंगा गावात शाळेची इमारत असतानाही शिक्षक उपलब्ध नसल्याने गावातील तीन विद्यार्थिनींना दोन किलोमीटर अंतरावरील कोहका येथील शाळेत जावे लागत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. विशेष म्हणजे, विद्यार्थिनींचा हा रोजचा प्रवास जंगलातून होत असून परिसरात वाघाची दहशत असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.
दिपके यांनी या विद्यार्थिनींसोबत कोहका येथील शाळेपर्यंत प्रवास करून परिस्थितीची पाहणी केली. कोसालेंगा येथील शाळा कोहका येथे भरविण्यात येत असल्याचा फलक तेथे लावण्यात आला आहे. मात्र, कोहका येथील शाळेतही शिक्षकांची कमतरता असल्याचे पाहणीत दिसून आले. एका खोलीत पहिली ते चौथीचे वर्ग एकत्र भरविले जात असल्याची माहिती समोर आली.
कोहका येथील शाळेत २७ विद्यार्थी असून त्यांच्यासाठी दोन शिक्षक कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे विविध वर्गांचे अध्यापन एकाच खोलीत करण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे.वाघाच्या दहशतीतून ही मुले रोज शाळेत येतात. जंगलातून येताना सर्पदंश झाला किंवा एखाद्या हिंस्त्र प्राण्याने हल्ला केला तर त्याची जबाबदारी कोण घेणार ? असा सवाल अभिजित दिपके यांनी उपस्थित केला.
विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षण मिळणे हा मूलभूत प्रश्न आहे. मंत्री, वरिष्ठ अधिकारी किंवा प्रशासनातील जबाबदार व्यक्तीच्या मुलाला अशाच परिस्थितीत दोन किलोमीटर जंगलवाट तुडवत शाळेत पाठविण्याची वेळ आली असती, तर अशी व्यवस्था स्वीकारली असती का? असा प्रश्न दिपके यांनी उपस्थित केला.
कोसालेंगा येथील बंद शाळेची ग्रामसेवकांकडून साफसफाई करण्यात आल्याची माहितीही यावेळी समोर आली. मात्र, केवळ साफसफाई करण्यापेक्षा शाळा प्रत्यक्ष सुरू करून तेथे शिक्षक उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
डुम्मे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची पाहणी केली असता तेथेही अनेक मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे समोर आले. शाळेची इमारत जर्जर असून ती निर्लेखित करण्यासाठी २०२३ मध्ये पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. मात्र, अद्याप अंतिम कार्यवाही झालेली नसल्याचे सांगण्यात आले.
या शाळेत पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग असून विद्यार्थ्यांची संख्या ५७ आहे. या विद्यार्थ्यांसाठी केवळ दोन शिक्षक आणि एक मुख्याध्यापक कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी केवळ दोन वर्गखोल्या उपलब्ध असल्याने अध्यापनासाठीही जागेची कमतरता आहे.
शाळेच्या स्वच्छतागृहाची अवस्थाही समाधानकारक नसल्याचे पाहणीत दिसून आले. मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची मागणी ग्रामपंचायतीने दोन वर्षांपूर्वी पत्राद्वारे केली होती. मात्र, त्यानंतरही या मागणीकडे पुरेसे लक्ष देण्यात आले नसल्याचे समोर आले.
डुम्मे शाळेत पिण्याच्या पाण्यासाठी नळाची व्यवस्था पाहणीच्या अवघ्या एक दिवस आधी करण्यात आल्याची माहिती मिळाली. दौरा होणार असल्याने तातडीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली, असा आरोप यावेळी करण्यात आला. एखादी सुविधा एका दिवसात उपलब्ध करून देता येत असेल, तर त्यासाठी एवढे दिवस का लागले? असा सवाल अभिजित दिपके यांनी उपस्थित केला.
शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये पंख्यांची व्यवस्था नसल्याचेही निदर्शनास आले. तसेच काही विद्यार्थी दूरवरून शाळेत येत असून त्यांच्या येण्या-जाण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याची माहिती देण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीने विविध सुविधांसाठी प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला असल्याचेही सांगण्यात आले.
पोषण आहाराची व्यवस्था मात्र समाधानकारक असल्याचे पाहणीत दिसून आले.शिक्षणाच्या समान संधीचा प्रश्न ऐरणीवर कोसालेंगा येथे शाळा असूनही शिक्षक नाहीत आणि विद्यार्थिनींना जंगलातून दोन किलोमीटर अंतर पार करून दुसऱ्या गावातील शाळेत जावे लागते.दुसरीकडे डुम्मे येथे शाळा सुरू असली.
तरी जर्जर इमारत,अपुऱ्या वर्गखोल्या, शिक्षकांची कमतरता, स्वच्छतागृह आणि इतर मूलभूत सुविधांचे प्रश्न कायम आहेत.दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अशी परिस्थिती सहन करावी लागत असेल,तर शिक्षणाच्या समान संधीचे धोरण प्रत्यक्षात कितपत पोहोचले आहे, हा प्रश्न या पाहणीतून पुन्हा ऐरणीवर आला आहे.
शाळा गावात असो वा दुसऱ्या गावात, विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण, पुरेसे शिक्षक, योग्य वर्गखोल्या, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी आणि आवश्यक शैक्षणिक सुविधा मिळणे गरजेचे आहे.या समस्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
error: Content is protected !!