Tuesday, October 13, 2026
Home Chandrapur नागभीडमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा ; ३०० हून अधिक ट्रॅक्टर आणि...

नागभीडमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा ; ३०० हून अधिक ट्रॅक्टर आणि दुचाकींसह जनसागर उसळला ” बोनस आमच्या हक्काचा,नाही कुणाच्या बापाचा…”  घोषणासह धान बोनस,२४ तास वीज मिळण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी

नागभीडमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा ; ३०० हून अधिक ट्रॅक्टर आणि दुचाकींसह जनसागर उसळला

” बोनस आमच्या हक्काचा,नाही कुणाच्या बापाचा…”  घोषणासह धान बोनस,२४ तास वीज मिळण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी

सुकदर्शन वृतांत 
नागभीड : (नितीन भेंडाळे – प्रतिनिधी) धान उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी साई मंदिर तळोधी (बा.) येथून नागभीड तहसील कार्यालयावर एक भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला.नागभीड तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी ट्रॅक्टरसह रस्त्यावर उतरल्याने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. मुसळधार पावसातही शेतकऱ्यांचा उत्साह कमी झाला नाही; त्यांनी तहसील कार्यालय परिसरात ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी केली.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या : – 
 धान बोनस : – सरकारने घोषित केलेला धान बोनस त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावा. बोनस रखडल्यामुळे शेतकरी तीव्र आर्थिक अडचणीत सापडला आहे.
हमीभाव (MSP) : – धान उत्पादक शेतकऱ्यांच्या धानाला प्रति क्विंटल ४,००० रुपये किमान आधारभूत किंमत (हमीभाव) मिळावी.
 अखंडित वीज पुरवठा : –  शेतीसाठी २४ तास सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा. वारंवार वीज खंडित होत असल्यामुळे सिंचनाचे नियोजन कोलमडले आहे.
 नवीन कृषिपंप वीज जोडणी : – शेतकऱ्यांचे प्रलंबित असलेले कृषिपंप वीज कनेक्शन त्वरित मंजूर करून नवीन वीज जोडणी देण्यात यावी.
 कृषी साहित्यांचे दर नियंत्रण : – बियाणे, खते, कीटकनाशके, कृषी अवजारे आणि पंप यांच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण आणून शेतकऱ्यांना माफक दरात साहित्य उपलब्ध करून द्यावे.
 राम मंदिर चौकात ठिय्या आणि निवेदन : – 
हा विशाल मोर्चा तळोधी बा.येथील साई मंदिरापासून रॅलीच्या स्वरूपात निघून नागभीड तहसील कार्यालयात पोहोचला.दरम्यान, नागभीड येथील राम मंदिर चौकात शेतकऱ्यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करत सरकारविरोधात तीव्र रोष व्यक्त केला. ” बोनस आमच्या हक्काचा,नाही कुणाच्या बापाचा…” अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. यानंतर तहसीलदार महेश देशमुख यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
 प्रमुख नेत्यांची उपस्थिती : – 
या ऐतिहासिक मोर्चामध्ये ज्येष्ठ शेतकरी नेते प्रकाश पोहरे, नागभीडच्या नगराध्यक्षा स्मिता खापर्डे, नयनाताई गेडाम,पद्माताई कांबळी, विनोद बोरकर, खोजराम मरसकोल्हे, धनंजय बोरकर, गिरीश नवघडे, श्रीकृष्णा गंजेवार, हितेश मुंगमोडे, रमेश घुगुसकर, तुकाराम निकुरे, दिवाकर कांबळी, संजय अगडे, आतिष भाकरे, अमोल भाकरे, प्रमोद गायकवाड, रुपचंद झोडे यांच्यासह परिसरातील हजारो शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!