Tuesday, October 13, 2026
Home Chandrapur ” गाव बदलाचा साक्षीदार ” आणि ” अ डेथ इन द फॉरेस्ट...

” गाव बदलाचा साक्षीदार ” आणि ” अ डेथ इन द फॉरेस्ट ” चळवळीचे जिवंत दस्तऐवज लोकसत्ताचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे यांचे प्रतिपादन

” गाव बदलाचा साक्षीदार ” आणि ” अ डेथ इन द फॉरेस्ट ” चळवळीचे जिवंत दस्तऐवज

लोकसत्ताचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे यांचे प्रतिपादन

सुकदर्शन वृतांत 
मूल : चळवळीत मनापासून केलेले कार्य आणि त्यातून आलेले अनुभव आयुष्याचा अविभाज्य भाग बनतात. मात्र सामाजिक चळवळींचे दस्तऐवजीकरण फारसे होत नाही. ‘गाव बदलाचा साक्षीदार’ आणि ‘अ डेथ इन द फॉरेस्ट’ या दोन पुस्तकांच्या माध्यमातून श्रमिक एल्गारच्या कार्याचे दस्तऐवजीकरण झाले असून, ही दोन्ही पुस्तके चळवळीचे जिवंत दस्तऐवज ठरतील, असे प्रतिपादन दै.लोकसत्ताचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे यांनी केले.
चितेगाव येथील श्रमिक एल्गार कार्यालय परिसरात एल्गार प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. विजय सिद्धावार लिखित ‘गाव बदलाचा साक्षीदार’ आणि अॅड. पारोमिता गोस्वामी लिखित ‘अ डेथ इन द फॉरेस्ट’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन देवेंद्र गावंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात श्रमिक एल्गार कार्यालय परिसरात असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी आमदारांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली.
या प्रसंगी श्रमिक एल्गारच्या संस्थापिका अॅड. पारोमिता गोस्वामी, ज्येष्ठ नाट्यकर्मी व साहित्य अभ्यासिका प्रा. डॉ. जयश्री कापसे, युवा साहित्यिक अविनाश पोईनकर, अधिवक्ता अॅड. कल्याण कुमार, सामाजिक कार्यकर्ते चंदू पाटील मारकवार, श्रमिक एल्गारचे माजी अध्यक्ष राजेश्वर सहारे यांच्यासह आमदार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
देवेंद्र गावंडे म्हणाले की, आपण जे काम मनापासून करतो आणि जे अनुभवतो, ते कधीही विसरता येत नाही. विजय सिद्धावार आणि अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी अनेक वर्षे सामाजिक चळवळीत काम केले आहे. त्यामुळे या काळातील अनुभव त्यांच्या आयुष्याचा भाग बनले आहेत. हे अनुभव पुस्तकाच्या माध्यमातून शब्दबद्ध झाल्याने श्रमिक एल्गारच्या संघर्षाचा आणि कार्याचा इतिहास पुढील पिढ्यांसमोर येणार आहे.
“ चळवळीचे दस्तऐवजीकरण साधारणपणे होत नाही. मात्र या दोन पुस्तकांच्या निमित्ताने श्रमिक एल्गारच्या कार्याचा दस्तऐवज तयार झाला आहे.त्यामुळे ही पुस्तके केवळ साहित्यकृती नसून चळवळीचा जिवंत इतिहास सांगणारी साधने आहेत ,” असे गावंडे यांनी नमूद केले.
श्रमिक एल्गारच्या कार्याचा संदर्भ देताना गावंडे म्हणाले की, श्रमिक एल्गारच्या स्थापनेपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात राजकीय पक्षांच्या पलीकडे जाऊन अराजकीय पद्धतीने जनतेचे प्रश्न घेऊन प्रशासनावर दबाव निर्माण करणारे व्यासपीठ फारसे दिसत नव्हते. श्रमिक एल्गारने अराजकीय व्यासपीठ उभे करून जनतेच्या प्रश्नांना हात घातला. त्यातून ही चळवळ विस्तारत गेली, असे त्यांनी सांगितले.यावेळी प्रा.डॉ.जयश्री कापसे,अॅड.पारोमिता गोस्वामी, अविनाश पोईनकर,चंदू पाटील मारकवार आणि अॅड. कल्याण कुमार यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय सिद्धावार यांनी केले.विजय कोरेवार यांनी सूत्रसंचालन केले, तर घनश्याम मेश्राम यांनी आभार मानले.कार्यक्रमाला श्रमिक एल्गारचे कार्यकर्ते,सभासद,पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!