Home Chandrapur चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर. ...
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर.
📍खराब रस्त्यामुळे रुग्णवाहिका वेळेत गावात पोहोचू न शकल्याने प्रसूतीनंतर एका 25 वर्षीय महिलेचा मृत्यू.
सुकदर्शन वृतांत
जिवती : चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.खराब रस्त्यामुळे रुग्णवाहिका वेळेत गावात पोहोचू न शकल्याने प्रसूतीनंतर एका 25 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.या दुर्दैवी घटनेमुळे ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा आणि मूलभूत पायाभूत सुविधांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार,जिवती तालुक्यातील तेलंगणा सीमेवरील दुर्गम घोडनकप्पी गावात राहणाऱ्या संगीता गेडाम यांची आठव्या महिन्यात घरीच प्रसूती झाली.बाळाचा जन्म झाल्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला.
कुटुंबीयांनी तत्काळ आरोग्य विभागाला माहिती दिली.गावाकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब असल्याने रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचू शकली नाही.उपचाराअभावी संगीताचा दुर्दैवी मृत्यू झाला.
जिल्हा आरोग्य विभागाने या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, गर्भधारणे दरम्यान महिलेची नियमित तपासणी करण्यात येत होती.गावात रस्ता नसल्याने प्रसूतीपूर्वी माहेरी जाण्याचा किंवा पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राहण्याचा सल्लाही देण्यात आला होता.मात्र संबंधित महिलेने तो प्रस्ताव नाकारला होता.
त्यानंतर आठव्या महिन्यातच अचानक प्रसूती झाल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. महाराष्ट्रातील दुर्गम भागातील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी कसा संघर्ष करावा लागतोय, याचे एक अत्यंत हृदयद्रावक आणि हेलावून टाकणारे उदाहरण चंद्रपूर जिल्ह्यातून समोर आले आहे.
या ताज्या घटनेनंतर दुर्गम भागातील रस्ते,आपत्कालीन आरोग्य सेवा आणि मातृसुरक्षेच्या सुविधांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
error: Content is protected !!