Friday, June 19, 2026
Home Chandrapur चंदनखेडा मार्गावरील पिरली फाट्याजवळ जंगली डुकराच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू ; पती...

चंदनखेडा मार्गावरील पिरली फाट्याजवळ जंगली डुकराच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू ; पती गंभीर जखमी.

0
15

चंदनखेडा मार्गावरील पिरली फाट्याजवळ जंगली डुकराच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू ; पती गंभीर जखमी.

सुकदर्शन वृतांत 

भद्रावती : भद्रावती – चोरा – चंदनखेडा मार्गावरील पिरली फाट्याजवळ जंगली डुकराच्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला.तर तिचे पती गंभीर जखमी झाले. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पुष्पा किशोर चिकटे वय,45 वर्ष रा. श्रीरामनगर असे मृत महिलेचे नाव असून किशोर चिकटे वय,51 वर्ष हे गंभीर जखमी झाले आहेत.

त्यांच्यावर भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पा आणि किशोर चिकटे हे दुचाकीने प्रवास करीत असताना पिरली फाट्याजवळ अचानक एक जंगली डुक्कर रस्त्यावर आले. दुचाकीसमोर आलेल्या डुकराने वाहनाला जोरदार धडक दिल्याने दोघांचाही तोल गेला आणि ते रस्त्यावर फेकले गेले.

या अपघातात पुष्पा चिकटे यांच्या डोक्याला व शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाली.तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.तर किशोर चिकटे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून याप्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.भद्रावती – चोरा – चंदनखेडा मार्गासह परिसरातील अनेक रस्त्यांवर वन्यप्राण्यांचा वावर वाढला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

विशेषतः रात्रीच्या वेळी जंगली डुक्कर, नीलगाय आणि इतर वन्यप्राणी रस्त्यावर येत असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाने संवेदनशील भागांमध्ये इशारा फलक, संरक्षणात्मक उपाययोजना आणि वन्यप्राण्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत,अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे श्रीरामनगर परिसरात शोककळा पसरली असून चिकटे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!