Home Breaking News धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे...
धानोरा तालुक्यातील विद्यार्थिनींना सर्पदंश प्रकरण,जपतलाई आश्रमशाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
📍मूलभूत सुविधा,कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची व्यवस्था नसतानाही तपासणी करून शाळेला पात्र ठरविणाऱ्या अधिकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश.
सुकदर्शन वृतांत
धानोरा : शिक्षणासाठी आश्रमशाळेत पाठवलेल्या तीन आदिवासी विद्यार्थिनींचे सर्पदंशाने बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे.धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले.
आश्रमशाळेत मूलभूत सुविधा,कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची व्यवस्था नसतानाही तपासणी करून शाळेला पात्र ठरविणाऱ्या अधिकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी संस्थाचालकाविरोधात फौजदारी कारवाईचे आदेश दिल्याचे स्पष्ट केले.
आदिवासी दिनाच्या रात्री जपतलाई आश्रमशाळेतील एका खोलीत झोपलेल्या सहा विद्यार्थिनींना सर्पदंश झाला.त्यात सुष्मिता सरोजित मंडल वय,14 वर्ष,दीपिका एतवा लकडा वय,12 वर्ष आणि अनु गजुराम कोरेटी वय,8 वर्ष या तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाला.
दीपिका बिटलूरसाय मडावी वय,11 वर्ष हिला गंभीर अवस्थेत नागपूरला हलविण्यात आले असून समृद्धी सुरेश नैताम वय,14 वर्ष आणि कविता राजकुमार किरंगा वय, 12 वर्ष यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिन्ही गंभीर विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या दुर्घटनेने आश्रमशाळांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.सहपालकमंत्री जयस्वाल यांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर शाळा व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणावर बोट ठेवले. विद्यार्थिनी ज्या खोलीत जमिनीवर झोपल्या होत्या, त्यामागे लाकडांचा मोठा ढीग आणि खिडकीजवळ विटांची थप्पी असल्याचे त्यांनी सांगितले.
याच खिडकीतून सापाने खोलीत प्रवेश केला असण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या जीविताची अशी दयनीय व्यवस्था असतानाही शाळेची तपासणी नेमकी कशी झाली,असा प्रश्न उपस्थित झाला आहे.मुख्यमंत्र्यांनी आता राज्यातील सर्व आश्रमशाळांची व्यापक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
दुर्गम भागातील आश्रमशाळांचीही नियमित पाहणी करून सुरक्षित निवास, कर्मचारी,आरोग्य सुविधा आणि अन्य मूलभूत सोयी उपलब्ध आहेत की नाहीत, याची खातरजमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सुष्मिता मंडल,दीपिका लकडा आणि अनु कोरेटी या तिन्ही विद्यार्थिनींवर सोमवारी रात्री त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.शिक्षणासाठी घराबाहेर पाठवलेल्या लेकींचे पार्थिवच परतल्याने तीन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
घटनेनंतर पालकांनी मंगळवारी जपतलाई गाठून आपल्या पाल्यांना घरी नेले. दरम्यान, या प्रकरणात संबंधित प्रकल्प अधिकारी अरुण एम.यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित झाले असून,त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी आदिवासी व सामाजिक संघटनांनी केली आहे.
आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या विरोधात संताप ” संवाद चिमुकल्यांशी ” अभियानाच्या माध्यमातून आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा गाजावाजा करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात सुरक्षेच्या उपाययोजना कागदावरच राहिल्याचा आरोप होत आहे.
यापूर्वीही गडचिरोलीतील आश्रमशाळेत विषबाधेचे गंभीर प्रकरण घडले होते. त्यावेळीही मंत्री अशोक उईके यांनी गडचिरोलीत येऊन परिस्थितीची पाहणी करण्याची तसदी घेतली नाही, असा आरोप आदिवासी संघटनांनी केला आहे.आता जपतलाई येथील तीन विद्यार्थिनींच्या सर्पदंशाने मृत्यूच्या घटनेनंतरही मंत्री जिल्ह्यात आलेले नाहीत.
त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत उदासीनता दाखविणाऱ्या उईके यांना आदिवासी विकास मंत्रीपदावरून हटवावे,अशी मागणी विविध आदिवासी संघटनांकडून करण्यात येत आहे.
error: Content is protected !!