Home Breaking News भामरागड तालुक्यातील गुंडेनूर नाल्याला पूर,सात गावांचा संपर्क तुटला ; पूर ओसरल्याशिवाय मार्ग...
भामरागड तालुक्यातील गुंडेनूर नाल्याला पूर,सात गावांचा संपर्क तुटला ; पूर ओसरल्याशिवाय मार्ग खुला होत नसल्याने अनेकांना त्रास.
📍मुदत संपूनही काम अपूर्ण असल्याने ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून प्रवास करण्याची वेळ.
सुकदर्शन वृतांत
भामरागड : भामरागड तालुक्यातील लाहेरी परिसरातील गुंडेनूर नाल्याला आलेल्या पुरामुळे तब्बल सात गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे.विशेष म्हणजे या नाल्यावर पुलाचे काम सुरु असले,तरी ते मुदत संपूनही काम अपूर्ण असल्याने ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून प्रवास करण्याची वेळ आली आहे.पुरामुळे गुंडेनूर,पेरमलभट्टी, पुंगासूर,तुर्रेमरका,दामनमर्का आणि परिसरातील इतर गावांचा संपर्क तुटला आहे.
या गावातील नागरिकांना अत्यावश्यक कामांसाठी,शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, तसेच आजारी रुग्णांना उपचारासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पूर ओसरल्याशिवाय मार्ग खुला होत नसल्याने अनेकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे.
तर काही जण जीव धोक्यात घालून पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होत असताना, पुलाचे काम अद्याप अपूर्ण असल्याने प्रशासनाच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पावसाळ्यापूर्वी पूल पूर्ण झाला असता तर सात गावांतील नागरिकांना या संकटाचा सामना करावा लागला नसता, अशी भावना स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.
error: Content is protected !!