Home Breaking News ऐन पोळ्याच्या दिवशी तरुण शेतकऱ्याची आत्महत्या ; दुष्काळामुळे ” या ” गावात...
ऐन पोळ्याच्या दिवशी तरुण शेतकऱ्याची आत्महत्या ; दुष्काळामुळे ” या ” गावात पोळा भरलाच नाही
तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
सुकदर्शन वृतांत
यवतमाळ : महाराष्ट्रात सर्वत्र पोळा हा बळीराजाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, पश्चिम विदर्भातून मात्र शेतकऱ्यांच्या भीषण दुरवस्थेची आणि अस्वस्थ करणारी चित्रे समोर आली आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील करणवाडी (ता.मारेगाव) येथे आज गुरुवारी पोळ्याच्याच दिवशी एका तरुण शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली.
तर शेतीवरील संकट आणि दुष्काळी परिस्थितीमुळे केळापूर तालुक्यातील उमरी गावात शेतकऱ्यांनी यंदा पोळा सण साजरा न करण्याचा अत्यंत वेदनादायी निर्णय घेतला.मिळालेल्या माहितीनुसार,करणवाडी येथील प्रणित नेहारे या युवा शेतकऱ्याने सततची नापिकी आणि कर्जाच्या वाढत्या ओझ्याला कंटाळून आपले जीवन संपवले.
निसर्गाची अवकृपा आणि उसनवारीने घेतलेल्या कर्जाचा डोंगर यामुळे हा तरुण शेतकरी प्रचंड तणावाखाली होता. ऐन सणाच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे करणवाडी गावावर शोककळा पसरली आहे. विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशारे तिवारी यांनी मृताच्या कुटुंबियाची भेट घेवून, शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांवर जोरदार टीका केली.
यावेळी प्रणित यांच्या कुटुंबियांनी केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.दुसरीकडे, जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील उमरी या गावात यावर्षी भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या मते, १९७२ च्या ऐतिहासिक दुष्काळानंतर यंदा प्रथमच अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे.
ऐन पिकांच्या वाढीच्या आणि फुलोऱ्याच्या काळात पावसाने दीर्घ दडी मारल्यामुळे उभी पिके करपून गेली आहेत. दुबार-तिबार पेरणीचा खर्च, बियाणे, खते आणि मजुरीचा खर्च वाया गेल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती पूर्णपणे कोलमडली आहे. या गंभीर संकटामुळे सर्जा-राजाची पूजा करण्याची आणि सण साजरा करण्याची मानसिकता उरली नसल्याने गावकऱ्यांनी पोळ्यावर बहिष्कार टाकल्याचे गावकरी रमेश चव्हाण,प्रशांत बोंडे आणि आकाश राठोड यांनी सांगितले.
विदर्भात यंदा दुबार आणि तिबार पेरणी करूनही पावसाच्या खंडाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन आणि तूर ही प्रमुख पिके हातातून गेल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. पिके करपल्याने केवळ शेतकऱ्यांचाच नव्हे, तर शेतमजूर आणि ग्रामीण भागातील व्यापारी,कृषी सेवा केंद्रांवरही याचा विपरीत परिणाम झाला असून संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थाच धोक्यात आली आहे.
या भीषण पार्श्वभूमीवर विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांच्यासह स्थानिक शेतकरी प्रतिनिधींनी प्रशासनाकडे युद्धपातळीवर पंचनामे करण्याची मागणी केली आहे. प्रभावित भागात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी.
पीककर्जाचे पुनर्गठन,पीकविम्याची रक्कम आणि शेतमजुरांसाठी रोहयोची कामे सुरू करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. शासनाने प्रशासकीय निकषांच्या जाचात न अडकवता पीडित शेतकरी कुटुंबांना तातडीने आधार द्यावा, अशी आग्रही मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
error: Content is protected !!