Saturday, September 12, 2026
Home Breaking News भीषण अपघातात चिमुकल्यासह नऊ जणांचा मृत्यू ; बारा जण जखमी

भीषण अपघातात चिमुकल्यासह नऊ जणांचा मृत्यू ; बारा जण जखमी

भीषण अपघातात चिमुकल्यासह नऊ जणांचा मृत्यू ; बारा जण जखमी

सुकदर्शन वृतांत 
भंडारा : तीज म्हणजे सुवासिनींच्या आयुष्यातील आनंदाचा,माहेरच्या मायेचा आणि सौभाग्याचा सण.तीजचा सण जवळ आला की सुवासिनींच्या मनाला माहेरची ओढ लागते.माहेरी तीज साजरी करण्यासाठी अशाच काही सुवासिनी छत्तीसगडहून नागपूर ला येण्यासाठी निघाल्या होत्या.सोबत होती चिमुकली कुणाच्या मनात माहेरच्या मायेची ओढ होती.
पहाटेची साखरझोप लागली आणि पिंपळगाव जवळ नियतीने असा घाला घातला की,यंदाची तीज त्या सुवासिनींसाठी काळरात्र ठरली.माहेरच्या अंगणात पोहोचण्याची आस मनात घेऊन निघालेल्या त्या सुवासिनींचा प्रवास माहेरच्या उंबरठ्याआधीच थांबला. आणि त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या माणसांच्या वाट्याला आला तो केवळ आक्रोश.
तीजच्या आनंदाआधीच सहा महिला आणि तीन चिमुकल्यांसह नऊ जणांच्या आयुष्यातील दिवा कायमचा विझला,तर १२ जण जखमी झाले.
काही क्षणांत एक आनंदी प्रवास मृत्यूच्या आक्रोशात बदलला.लाखनी तालुक्यातील पिंपळगाव येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास हा काळीज पिळवटून टाकणारा अपघात झाला.MH.49 U 9810९८ क्रमांकाची बोलेरो रायपूरकडून नागपूरकडे जात होती.
गाडीत महिला आणि लहान मुलांसह वीस जण प्रवास करीत होते.पहाटेची वेळ रस्त्यावर काळोख आणि गाडीतले बहुतांश प्रवासी गाढ झोपेत.त्यांना पुढच्या काही क्षणांत काय वाढून ठेवले आहे, याची पुसटशीही कल्पना नव्हती.
त्याचवेळी पिंपळगाव येथील पेट्रोल पंपावरून गाडी क्रं. UP 72 BT 7974  क्रमांकाचा ट्रक महामार्गावर येत होता. बोलेरोच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि भरधाव बोलेरोने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. धडक एवढी प्रचंड होती की, बोलेरोचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. झोपेत असलेल्या प्रवाशांना सावरण्याचीही संधी मिळाली नाही.
क्षणभरापूर्वी गाडीच्या आत सुरक्षित झोपलेली लेकरं आणि त्यांना कुशीत घेऊन बसलेल्या आया पुढच्याच क्षणी अपघाताच्या तडाख्यात सापडल्या. घटनास्थळी रक्ताचा सडा, तुटलेले वाहन आणि मदतीसाठी होणारा आक्रोश पाहून उपस्थितांचेही काळीज पिळवटून गेले.पहाटेच्या त्या काळोखात केवळ एक वाहन चिरडले गेले नव्हते; अनेक कुटुंबांची स्वप्नं, सणाचा आनंद आणि उद्याची आशा चिरडली गेली होती.
या भीषण अपघातात जामबई रामअवतार वर्मा (५०), मीनाक्षी राजकुमार वर्मा (२६), धैर्य रुपेश उईके (४), स्वीटी रुपेश उईके (६), गायत्री रुपेश उईके (३०), गणेशीया अरावत पटले (२२), सरिता विजय वर्मा (३०), ग्रेशा राजकुमार वर्मा (२) आणि राजकुमारी प्रल्हाद पटेल (३५) यांचा मृत्यू झाला.
अपघातात १२ जण जखमी झाले असून त्यात सहा महिला, चार मुले आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. अपघातात गुलशन रमेश वर्मा (२२), ललिता योगेश पटेल (२६), तन्मय योगेश पटेल (४), डॉली अरावत पटेल (४), सुखयारी पटेल (२०), रामकुमारी पटेल (५७), रमय्या पटेल (३०), दरयार पटेल (७), सुभाष विजय वर्मा (५), रितेश विजय वर्मा (३), मेघा राजकुमार वर्मा (३), तसेच बोलेरो चालक जगदेव ऊर्फ जग्गू निर्मल वर्मा (रा. खामला,नागपूर) हे जखमी झाले आहेत.
जखमींपैकी काहींवर भंडारा येथे, तर गंभीर जखमींवर नागपूर येथे उपचार सुरू आहेत. जखमींना पोलिसांच्या मदतीने रुग्णवाहिकेतून साकोली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी भंडारा आणि नागपूर येथे हलविण्यात आले. एका चिमुकल्याला किरकोळ दुखापत झाली असून अन्य जखमींवर उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच लाखनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.साकोली टोल प्लाझा पेट्रोलिंग पथकाकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बचावकार्य सुरू केले.मृतदेह भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.अपघाताचा पुढील तपास लाखनी पोलिस करीत आहेत.
error: Content is protected !!