Home Breaking News नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे शेळीचा शोध घेण्यासाठी जंगलात गेलेल्या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात...
नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे शेळीचा शोध घेण्यासाठी जंगलात गेलेल्या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू.
सुकदर्शन वृतांत
नागभीड : नागभीड तालुक्यातील गिरगाव परिसरात हरवलेल्या शेळीचा शोध घेण्यासाठी जंगलात गेलेल्या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. आत्माराम दसरू बोरकर वय,५२ वर्ष असे मृत शेतकऱ्याचे नाव असून या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. तसेच जंगलालगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
माहितीनुसार,गिरगाव येथील रहिवासी आत्माराम बोरकर हे गुरुवारी (१८ जून) नेहमीप्रमाणे आपल्या शेळ्या चारण्यासाठी जंगलात गेले होते. सायंकाळी घरी परतल्यानंतर त्यांची एक शेळी जंगलातच राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले.पशुपालन हा कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा महत्त्वाचा आधार असल्याने त्यांनी हरवलेल्या शेळीचा शोध घेण्यासाठी पुन्हा जंगलात जाण्याचा निर्णय घेतला.
उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत.त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली.पत्नी,मुले आणि नातेवाईकांनी रात्रभर त्यांच्या परतीची प्रतीक्षा केली.दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांनी जंगल परिसरात शोधमोहीम सुरू केली.या शोधादरम्यान त्यांचा मृतदेह जंगलात आढळून आला. प्राथमिक तपासात वाघाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक महेश गायकवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी ए.आर.कन्नमवार,क्षेत्र सहाय्यक हिंगणघर, पोलीस निरीक्षक राहुल गुहे तसेच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली असून मृताच्या कुटुंबीयांना शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
आत्माराम बोरकर हे परिसरात कष्टाळू,शांत आणि मनमिळावू शेतकरी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावाने एक मेहनती आणि जिव्हाळ्याचा व्यक्ती गमावल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या घटनेनंतर जंगलालगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अलीकडील काळात वन्यप्राण्यांचा वाढता वावर आणि मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वनविभागाने वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात तसेच ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना द्याव्यात,अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
error: Content is protected !!