Home Gadchiroli गडचिरोलीत खड्डे बुजवताय की मृत्यूचा सापळा रचताय ? राष्ट्रीय महामार्ग क्र.353C वर...
गडचिरोलीत खड्डे बुजवताय की मृत्यूचा सापळा रचताय ?
राष्ट्रीय महामार्ग क्र.353C वर खड्ड्यांची थातूरमातूर मलमपट्टी ; वाहनधारकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
सुकदर्शन वृत्तांत
गडचिरोली : गडचिरोली शहरात प्रवेश करताच आरमोरी मार्गावरील खरपुंडी नाक्याजवळ रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. मात्र, खड्डे बुजविताना मोठ्या आकाराची बोल्डर गिट्टी टाकण्यात येत असल्याने आणि त्यानंतर योग्य पद्धतीने ड्रेसिंग व रोलिंग न झाल्यास ही गिट्टी रस्त्यावर पसरून वाहनधारकांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.
त्यामुळे ” खड्डे बुजवताय की मृत्यूचा सापळा रचताय ? ” असा सवाल नागरिक व वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे.
गडचिरोली-आरमोरी मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग क्र. 353C (NH-353C) चा भाग असून या मार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे बुजविताना निर्धारित तांत्रिक पद्धतीचा अवलंब करून कामाची गुणवत्ता आणि वाहनधारकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आवश्यक आहे.
खरपुंडी नाक्याजवळ रविवारी दुपारच्या सुमारास खड्डे बुजविण्याचे काम सुरू होते. यावेळी खड्ड्यांमध्ये मोठ्या आकाराची गिट्टी टाकण्यात आली होती. मात्र, गिट्टी टाकल्यानंतर तिचे योग्य ड्रेसिंग व रोलिंग झाले नाही, तर काही दिवसांतच गिट्टी बाहेर निघून रस्त्यावर विखुरली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी रस्त्यावर पसरलेली गिट्टी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अनेक ठिकाणी पुन्हा उखडला रस्ता
आरमोरी मार्गावरील अनेक ठिकाणी याच पद्धतीने खड्डे बुजविण्यात आल्याचे दिसून येते. मात्र, काही ठिकाणी अल्पावधीतच खड्ड्यांमधील गिट्टी बाहेर निघून रस्त्यावर पसरल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या दुरुस्तीच्या कामांची गुणवत्ता, टिकाऊपणा आणि देखभाल पद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, खड्डे बुजविण्याची कामे करून वारंवार दुरुस्तीची बिले काढली जात असल्याने शासकीय निधीच्या वापराबाबतही काही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या आरोपांची संबंधित विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती तपासणे आवश्यक आहे.रस्त्याच्या दुरुस्तीवर होणारा खर्च,कामाची गुणवत्ता आणि प्रत्यक्ष करण्यात आलेल्या कामाची मोजणी यांची तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
” खड्ड्यांचा महामार्ग ” होऊ नये
गडचिरोली ते आरमोरी महामार्गावर अनेक ठिकाणी अद्यापही खड्डे कायम आहेत. खड्डे पडणे, त्यावर तात्पुरती दुरुस्ती करणे आणि पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे निर्माण होणे, असा प्रकार सुरू असल्याची तक्रार वाहनधारकांकडून केली जात आहे.
खड्डे बुजविताना केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता आवश्यक तांत्रिक निकषांनुसार दुरुस्ती करून रस्ता सुरक्षित आणि टिकाऊ करावा, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे. राष्ट्रीय महामार्गावरच खड्डे आणि रस्त्यावर विखुरलेली गिट्टी वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत असेल, तर ” हा राष्ट्रीय महामार्ग की खड्ड्यांचा महामार्ग ? ” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
संबंधित विभागाने या मार्गाची तातडीने पाहणी करून खड्डे बुजविण्याच्या कामाची गुणवत्ता तपासावी तसेच वाहनधारकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
error: Content is protected !!