Saturday, September 12, 2026
Home Breaking News चामोर्शी तालुक्यातील पोलीस कर्मचाऱ्याच्या आईची दगडाने ठेचून निर्घृण हत्या न्यायवैज्ञानिक पथकाकडून घटनास्थळाची...

चामोर्शी तालुक्यातील पोलीस कर्मचाऱ्याच्या आईची दगडाने ठेचून निर्घृण हत्या न्यायवैज्ञानिक पथकाकडून घटनास्थळाची पाहणी

चामोर्शी तालुक्यातील पोलीस कर्मचाऱ्याच्या आईची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

न्यायवैज्ञानिक पथकाकडून घटनास्थळाची पाहणी

सुकदर्शन वृतांत 
गडचिरोली : शेतातून घरी परतणाऱ्या ६० वर्षीय महिलेची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेला दोन दिवस उलटले, तरी आरोपीचा मागमूस लागलेला नाही.विशेष म्हणजे,मृत महिलेचा एक मुलगा पोलीस दलात चालक अंमलदार म्हणून सेवारत आहे. त्यामुळे या हत्येचे नेमके कारण काय आणि मारेकरी कोण,याबाबत परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
गोपिकाबाई रामचंद्र गायकवाड असे मृत महिलेचे नाव आहे. त्या नारायणपूर चक क्रमांक २ येथे राहत होत्या.त्यांचे पती रामचंद्र गायकवाड देवदर्शनासाठी वृंदावन येथे गेले होते. त्यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा प्रकाश घोट येथे कुटुंबासह राहतो, तर धाकटा प्रांजीत जून २०२३ मध्ये चालक पोलीस अंमलदार म्हणून भरती झाला असून तो अहेरी येथे पत्नीसह राहतो.
५ सप्टेंबर रोजी गोपिकाबाई नेहमीप्रमाणे सकाळी शेतात गेल्या होत्या. सायंकाळी 7:30.पर्यंत त्या घरी परतल्या नसल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यावेळी जंगलातील पायवाटेपासून सुमारे ४० ते ५० मीटर अंतरावर त्यांचा मृतदेह आढळून आला. दगडाने चेहरा ठेचून त्यांची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून आले.
प्रांजीत गायकवाड यांच्या तक्रारीवरून घोट पोलीस मदत केंद्रात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायवैज्ञानिक पथकाने घटनास्थळी पाहणी करून विविध पुरावे संकलित केले आहेत. घटनेनंतर दोन दिवस उलटूनही तपासाला ठोस दिशा देणारा धागा पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
हत्येमागील कारण, आरोपीची ओळख आणि महिलेची हत्या नेमकी कोणत्या परिस्थितीत झाली, याचा उलगडा तपासातून होणे अपेक्षित आहे. पोलिसांच्या तपासाकडे आता परिसराचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. आरोपीला लवकरात लवकर जेरबंद करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत,असे घोट पोलीस मदत केंद्राचे पोलीस निरीक्षक कल्पेश खरोडे यांनी सांगितले.
error: Content is protected !!