Home Chandrapur शिक्षण विभागातील अजब कारभार! सेवानिवृत्त शिक्षकांना पुन्हा नोकरी ; तरुण शिक्षकांवर बेरोजगारीची...
शिक्षण विभागातील अजब कारभार! सेवानिवृत्त शिक्षकांना पुन्हा नोकरी ; तरुण शिक्षकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड.
सुकदर्शन वृतांत
सावली : पंचायत समिती सावली अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत.विशेषतः सावली तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल व माध्यमिक शाळांना शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे.या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने अनुदानित शाळांमधून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांची कंत्राटी तत्त्वावर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
या भरतीमध्ये निवड झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकांना दरमहा ₹20,000 मानधन देण्यात येणार असून इच्छुकांनी पंचायत समिती, सावली येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.मात्र या निर्णयावरून शिक्षण विभागाच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
राज्यात पात्र व प्रशिक्षित डी.एड.बी.एड.टीईटी/सीटीईटी उत्तीर्ण हजारो तरुण शिक्षक रोजगाराच्या प्रतीक्षेत असताना, पुन्हा सेवानिवृत्त शिक्षकांनाच संधी देण्याचा निर्णय अनेकांच्या नाराजीचे कारण ठरत आहे.” नातवंडांसोबत खेळण्याचे वय असलेल्या शिक्षकांना पुन्हा वर्गात पाठविले जात आहे.
तर दुसरीकडे शिक्षकी पेशासाठी शिक्षण पूर्ण केलेले तरुण बेरोजगारच राहतात,” अशी प्रतिक्रिया अनेक बेरोजगार शिक्षकांकडून व्यक्त होत आहे. पेन्शनचा लाभ घेत असतानाच पुन्हा ₹20 हजार मानधनावर नियुक्ती देणे योग्य आहे का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
शिक्षणतज्ज्ञांच्या मते, रिक्त पदे भरून विद्यार्थ्यांचे नुकसान टाळणे आवश्यक असले तरी हा प्रश्न नियमित शिक्षक भरतीद्वारे सोडविणे अधिक योग्य ठरेल. तात्पुरत्या उपाययोजनांपेक्षा कायमस्वरूपी भरती करून तरुणांना रोजगार देण्याची मागणी जोर धरत आहे
शासनाच्या परिपत्रकानुसारच अनुदानित शाळांमधल्या सेवानिवृत्त शिक्षक यांना कंत्राटी शिक्षक 20000/_ मानधन करिता अर्ज मागविण्यात येत आहे. – किशोर बारसागडे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सावली.
दिवसेंदिवस तरुणांमध्ये बेरोजगारी वाढत असून त्यांचा विचार न करता त्यांचे सेवा कार्य पूर्ण झालेले आहे आणि आता निवृत्त होऊन घरी विश्रांती घ्यायची सोडून पुन्हा त्यांना कामावर रुजू करण्यात येत आहे तर हे कितपत योग्य आहे सेवेत असतानाही त्यांचं कुटुंबाकडे दुर्लक्ष झालाय आणि आता या वयात सुद्धा त्यांना काही काळ कुटुंबासोबत घालवण्याचे सोडून तब्येतीची परवा न करता कामावरती देण्यात येत आहे आणि तरुणांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे तिकडे टेटच्या पेपर फुटी मुळे तरुणांमध्ये निराशा आलेली आहे तर पुन्हा असल्या प्रकारचे परिपत्रक आल्यानंतर त्या तरुणांनी काय करायचे यावरती शासनाने दुर्लक्ष करून चालणार नाही शिक्षण विभागाने विचार करून तरुणांना संधी देण्याचे करावे. – पांडुरंग अमृतवार प्राचार्य,विश्वशांती कॉन्व्हेंट, सावली.
error: Content is protected !!