Home Breaking News 5 ते 10 लाखात नामांकित विद्यापीठांची बनावट पदव्यांची विक्री ; गोंडवाना विद्यापीठ...
5 ते 10 लाखात नामांकित विद्यापीठांची बनावट पदव्यांची विक्री ; गोंडवाना विद्यापीठ (गडचिरोली) सह चार विद्यापीठांची बनावट कागदपत्रे.
एका आरोपीला अटक ; बनावट पदव्यांच्या आधारे नोकऱ्या मिळवल्याचा संशय.
सुकदर्शन वृतांत
चंद्रपूर : नोकरी, महाविद्यालयीन प्रवेश आणि पदोन्नती मिळवून देण्याच्या आमिषाने नामांकित विद्यापीठांची बनावट पदवी,मार्कशीट, डिप्लोमा तसेच मायग्रेशन प्रमाणपत्रे तयार करून त्यांची तब्बल पाच ते दहा लाख रुपयांना विक्री करणारे रॅकेट चंद्रपुरात उघडकीस आले आहे.
दुर्गापूर पोलिसांनी या प्रकरणी तुकुम परिसरातील परिमल बाबुराव गौरकर (वय ३२) याच्याविरुद्ध फसवणूक आणि बनावट कागदपत्रांशी संबंधित गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे शैक्षणिक क्षेत्रासह प्रशासकीय आणि नोकरीच्या भरती प्रक्रियेत खळबळ उडाली असून, या बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे आणखी किती जणांनी नोकरी, प्रवेश किंवा पदोन्नती मिळवली आहे, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर शहरातील तुकुम परिसरातील चिंतामणी अपार्टमेंटमध्ये राहणारे वैभव गणपतराव माशीरकर हे एका खासगी कंपनीत कार्यरत आहेत. त्याच परिसरात राहणाऱ्या परिमल गौरकर याने जानेवारी २०२६ मध्ये माशीरकर यांना फोन केला. आपल्या वडिलांकडून कारची चावी घेऊन गाडीतील एक कापडी थैली काढून ती सुरक्षितपणे घरात ठेवण्याची विनंती त्याने केली.
शेजारी असल्याने माशीरकर यांनी गौरकरच्या सांगण्याप्रमाणे थैली आपल्या घरी आणून ठेवली. काही दिवसांनी गौरकरने त्या थैलीतून काही प्रमाणपत्रे काढून नेली. त्यानंतर पुन्हा काही प्रमाणपत्रे घेण्यासाठी तो माशीरकर यांच्या घरी आला. त्यावेळी माशीरकर यांनी या कागदपत्रांबाबत त्याच्याकडे चौकशी केली.
चौकशी दरम्यान गौरकरने धक्कादायक माहिती दिल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.नोकरी, महाविद्यालयीन प्रवेश अथवा पदोन्नतीसाठी पदवी, डिप्लोमा,टीसी किंवा मार्कशीटची गरज असलेल्या व्यक्तींकडून गरजेनुसार पाच ते दहा लाख रुपये घेऊन संबंधित प्रमाणपत्रे तयार करून देत असल्याचे त्याने सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या कबुलीनंतर माशीरकर यांनी थैलीची तपासणी केली असता त्यामध्ये विविध नामांकित विद्यापीठांच्या मोठ्या प्रमाणात संशयास्पद प्रमाणपत्रांचा साठा आढळून आला.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ,सोलापूर विद्यापीठ,श्रीधर युनिव्हर्सिटी (पिलानी,राजस्थान), गोंडवाना विद्यापीठ (गडचिरोली) आणि छत्रपती शाहूजी महाराज युनिव्हर्सिटी (कानपूर)
या विद्यापीठांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या सेमिस्टर मार्कशीट, डिप्लोमा प्रमाणपत्रे आणि मायग्रेशन प्रमाणपत्रांचा समावेश असल्याचे समोर आले.
या कागदपत्रांवर संबंधित विद्यापीठांचे बनावट शिक्के आणि खोट्या स्वाक्षऱ्या वापरण्यात आल्याचा प्राथमिक संशय आहे. त्यामुळे या प्रमाणपत्रांचा वापर नेमका कुठे आणि किती जणांनी केला, तसेच त्यांची निर्मिती कुठे केली जात होती, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे
गौरकर काही दिवस उलटूनही थैली परत घेण्यासाठी आला नाही. दरम्यान, त्यातील प्रमाणपत्रांची संख्या आणि स्वरूप लक्षात आल्यानंतर माशीरकर यांनी अखेर दुर्गापूर पोलिसांशी संपर्क साधला. त्यांनी संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगत कायदेशीर कारवाईची मागणी केली.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांची सत्यता, त्यांची निर्मिती कुठे झाली, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे आणि या प्रमाणपत्रांचा प्रत्यक्ष वापर कोणी केला, या सर्व बाबींचा तपास सुरू आहे.
या बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे काही व्यक्तींनी खासगी तसेच शासकीय नोकऱ्या मिळवल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच प्रवेश आणि पदोन्नतीसाठीही अशा प्रमाणपत्रांचा वापर झाला आहे का,याची चौकशी केली जात आहे.
जर बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या आधारे सरकारी किंवा खासगी संस्थांमध्ये नोकरी मिळविण्यात आल्याचे सिद्ध झाले, तर या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासाकडे शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
विविध कलमांन्वये गुन्हा दाखल,फिर्यादी वैभव माशीरकर यांच्या तक्रारीवरून दुर्गापूर पोलिसांनी परिमल बाबुराव गौरकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३१८(४), ३३६(३) आणि ३४०(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र नक्कनवार पुढील तपास करीत आहेत. बनावट प्रमाणपत्रांची निर्मिती, पुरवठा आणि वापराच्या साखळीपर्यंत तपास पोहोचतो का, याकडे आता लक्ष लागले आहे.
नामांकित विद्यापीठांच्या नावाने हुबेहूब प्रमाणपत्रे तयार करून ती लाखो रुपयांना विकली जात असल्याचा आरोप गंभीर आहे. अशा प्रमाणपत्रांचा वापर झाल्यास केवळ संबंधित संस्थांची फसवणूक होत नाही, तर पात्र उमेदवारांच्या संधीवरही परिणाम होऊ शकतो..त्यामुळे पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या प्रमाणपत्रांची संबंधित विद्यापीठांकडून पडताळणी करून घेणे.
या रॅकेटमागील व्यक्ती आणि आर्थिक व्यवहारांचा शोध घेणे तसेच बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे लाभ मिळविणाऱ्या व्यक्तींची माहिती मिळविणे हे तपासातील महत्त्वाचे टप्पे ठरणार आहेत.दरम्यान, या प्रकरणातील आरोप आणि प्राथमिक माहिती पोलिस तपासाच्या आधारे समोर आली असून, आरोपांची अंतिम सत्यता न्यायालयीन प्रक्रियेत निश्चित होणार आहे.
error: Content is protected !!