Friday, July 31, 2026
Home Breaking News शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे पाथरी हायस्कूलमध्ये संतापाचा स्फोट ; विद्यार्थ्यांचे भविष्य वाऱ्यावर; शिक्षण...

शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे पाथरी हायस्कूलमध्ये संतापाचा स्फोट ; विद्यार्थ्यांचे भविष्य वाऱ्यावर; शिक्षण विभाग अजूनही झोपेत. 📍पदे न भरल्यास शाळा व्यवस्थापन समितीकडून आंदोलनाचा इशारा.

0
26

शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे पाथरी हायस्कूलमध्ये संतापाचा स्फोट ; विद्यार्थ्यांचे भविष्य वाऱ्यावर; शिक्षण विभाग अजूनही झोपेत.

📍पदे न भरल्यास शाळा व्यवस्थापन समितीकडून आंदोलनाचा इशारा.

सुकदर्शन वृतांत 
सावली : जिल्हा परिषद हायस्कूल पाथरी येथील शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न आता गंभीर वळणावर पोहोचला असून, शाळा व्यवस्थापन समितीने थेट आंदोलनाचा इशारा दिल्याने शिक्षण विभागाची कार्यपद्धती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.वारंवार निवेदने, पाठपुरावा आणि विनंत्या करूनही शिक्षकांची पदे न भरल्याने पालक व ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे.
10 जून 2026 रोजी झालेल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत शिक्षकांच्या रिक्त पदांबाबत ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर मुख्याध्यापकांनीही अधिकृत पत्राद्वारे गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे हा गंभीर प्रश्न मांडला आहे.अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
माहितीनुसार, शाळेत मंजूर पदांच्या तुलनेत अनेक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. काही शिक्षकांकडे एकाच वेळी अनेक विषयांचा भार टाकण्यात आला आहे. परिणामी विद्यार्थ्यांना नियमित अध्यापन मिळत नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा बळी जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलण्याचे काम शिक्षण विभागाच्या निष्क्रियतेमुळे होत असल्याची भावना पालकांमध्ये आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून शिक्षक भरतीचा प्रश्न प्रलंबित असताना अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “विद्यार्थ्यांचे नुकसान होत असताना अधिकारी मात्र वातानुकूलित कार्यालयात बसून फाईली फिरवत आहेत,” अशी संतप्त प्रतिक्रिया बैठकीत उमटली.
शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरली नाहीत तर शाळेला कुलूप ठोकून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा शाळा व्यवस्थापन समितीअध्यक्ष दिलीप जाधव, प्रवीण वाघमारे व समितीने दिला आहे. त्यामुळे आता शिक्षण विभाग जागा होणार की पुन्हा आश्वासनांची खैरात करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
” पाथरी सारख्या मोठ्या शाळेत शिक्षकांची कमतरता असणे ही गंभीर बाब आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आम्ही सहन करणार नाही. तात्काळ पदभरती न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारले जाईल.” – दिलीप जाधव शा.व्य.स.अध्यक्ष,पाथरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!