Friday, July 31, 2026
Home Breaking News गडचिरोलीत पोलीस दलातील पोलीस उपअधीक्षक तथा सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या....

गडचिरोलीत पोलीस दलातील पोलीस उपअधीक्षक तथा सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या. 📍10 नवे उपअधीक्षक दाखल,7 जणांची जिल्ह्याबाहेर बदली.

0
20

गडचिरोलीत पोलीस दलातील पोलीस उपअधीक्षक तथा सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या.

📍10 नवे उपअधीक्षक दाखल,7 जणांची जिल्ह्याबाहेर बदली.

सुकदर्शन वृतांत 
गडचिरोली : राज्य शासनाच्या गृह विभागाने पोलीस उपअधीक्षक तथा सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचे आदेश जारी करत गडचिरोली जिल्ह्यात मोठे फेरबदल केले आहे.
या आदेशानुसार जिल्ह्यात कार्यरत असलेल्या जवळपास सर्वच उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नव्याने नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांपैकी बहुतांश हे पोलीस निरीक्षक पदावरून पदोन्नती मिळवत प्रथमच उपअधीक्षक म्हणून गडचिरोलीत दाखल होत आहेत.
या फेरबदलात घोट उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांची अकोला येथे बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी असीफ शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.एटापल्लीचे एसडीपीओ चैतन्य कदम यांची बारामती (पुणे) येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी संतोष बर्गे यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
कुरखेडा उपविभागातील एसडीपीओ रविंद्र भोसले यांची शिरूर (पुणे) येथे बदली झाली असून त्यांच्या जागी गिरीश गणपत बने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नक्षलविरोधी कारवायांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या भामरागड उपविभागातही बदल करण्यात आले आहेत.
येथील एसडीपीओ अमर मोहिते यांची पुसद (यवतमाळ) येथे बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी महेश चव्हाण हे पदभार स्वीकारणार आहेत.अहेरी उपविभागाचे एसडीपीओ अजय कोकाटे यांची नवी मुंबई येथे बदली झाली असून त्यांच्या जागी हेमंत गणपत चांदेवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हेडरीचे योगेश रांजणकर यांची पिंपरी-चिंचवड येथे बदली झाली असून त्यांच्या जागी शिवाजी गायकवाड हे जबाबदारी सांभाळतील.
सिरोंचा उपविभागाचे एसडीपीओ संदेश नाईक यांचीही पिंपरी-चिंचवड येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी परभणी येथून बदली होऊन आलेले समाधान पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय जिल्ह्यातील काही रिक्त पदे भरण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे.
त्यानुसार धनंजय अनंत जाधव यांची धानोरा उपविभागात, पराग काशिनाथ सोनावणे यांची हेडरी उपविभागात आणि सुनील उईके यांची अहेरी मुख्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच शुभदा संख्ये यांची नागपूर-गडचिरोली अमली पदार्थ विरोधी पथकात पोलीस उपअधीक्षक म्हणून पदस्थापना करण्यात आली आहे. सुरज जगताप यांची सोलापूर ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे.
अहेरी मुख्यालयातील अधिकारी विशाल नागरगोजे यांची शहापूर (ठाणे ग्रामीण) येथे बदली करण्यात आली आहे.गेल्या काही वर्षांत गडचिरोलीत उपअधीक्षक पदावर थेट नियुक्ती झालेल्या तरुण अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची पद्धत होती. मात्र यावेळी मोठ्या प्रमाणावर पदोन्नती मिळालेल्या पोलीस निरीक्षकांना येथे संधी देण्यात आली आहे.
त्यामुळे पोलीस विभागात या निर्णयाची विशेष चर्चा सुरू आहे. नव्याने आलेल्या काही अधिकाऱ्यांची पूर्वीची कारकीर्द वादग्रस्त ठरल्याची चर्चाही पोलीस वर्तुळात रंगली आहे.एकेकाळी नक्षलवादाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीची परिस्थिती आता झपाट्याने बदलत आहे.
सातत्यपूर्ण नक्षलविरोधी मोहिमा, शरणागती धोरण आणि विकासकामांमुळे जिल्हा मोठ्या प्रमाणात नक्षलमुक्त झाला आहे. त्यामुळे पूर्वीसारखी भीती आणि दहशतीचे वातावरण राहिलेले नाही. त्याचबरोबर दुर्गम आदिवासी भागांतील नागरिक आणि पोलीस विभाग यांच्यातील विश्वासाचे नाते मजबूत करण्यासाठी गेल्या काही वर्षांत विविध संवाद उपक्रम राबविण्यात आले आहेत.
अशा बदललेल्या परिस्थितीत नव्याने आलेल्या अधिकाऱ्यांसमोर केवळ सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी नसून नागरिकांशी निर्माण झालेला संवाद आणि विश्वास अधिक दृढ करण्याचेही मोठे आव्हान असणार आहे. ते ज्या जिल्ह्यांतून गडचिरोलीत आले आहेत, तेथील परिस्थिती आणि
गडचिरोलीतील भौगोलिक, सामाजिक व सुरक्षा विषयक वास्तव पूर्णपणे वेगळे आहे. त्यामुळे स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करत विकासाभिमुख पोलीसिंग, जनसंपर्क आणि नक्षलविरोधी मोहिमा यांचा समतोल राखणे हीच नव्या अधिकाऱ्यांची खरी परीक्षा ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!