Home Breaking News आईच्या डोळ्यादेखत अंगावर अचानक वीज कोसळल्याने तरुण मुलाचा दुर्दैवी मृत्यू.
आईच्या डोळ्यादेखत अंगावर अचानक वीज कोसळल्याने तरुण मुलाचा दुर्दैवी मृत्यू.
सुकदर्शन वृतांत
जळगाव : जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे शेतात कपाशी लागवडीचे काम करत असताना अंगावर अचानक वीज कोसळल्याने एका तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.
आईच्या डोळ्यादेखत घडलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शहापूर गावावर शोककळा पसरली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच घडलेल्या या घटनेने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राकेश रतिलाल पाटील (३२, रा. शहापूर, ता. अमळनेर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. राकेश पाटील हे शेती व्यवसायावर उदरनिर्वाह करणारे कष्टाळू आणि तरुण शेतकरी होते. कुटुंबाच्या शेतीची संपूर्ण जबाबदारी त्यांनी सांभाळली होती.यंदाच्या खरीप हंगामाच्या तयारीसाठी ते गेल्या काही दिवसांपासून शेतातील कामांमध्ये व्यस्त होते.
सोमवारी तालुक्यातील काही भागांत हलका पाऊस झाल्याने कपाशी लागवडीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले होते.त्यामुळे मंगळवारी सकाळी त्यांनी आपल्या आईसह काही महिला मजुरांना घेऊन शेतात कपाशी लागवडीचे काम सुरू केले होते. सकाळपासून वातावरण सामान्य होते.मजुरांच्या मदतीने शेतातील काम वेगाने सुरू होते.
दुपारच्या सुमारास मात्र अचानक हवामानात बदल झाला. आकाशात काळे ढग दाटून आले. आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला रिमझिम स्वरूपात सुरू झालेला पाऊस काही वेळातच वाढू लागला.त्याचवेळी शेतात उभी असलेली दुचाकी सुरक्षित ठिकाणी लावण्यासाठी राकेश पाटील यांनी रस्त्याकडे धाव घेतली.
नियतीला काही वेगळेच मंजूर होते. दुचाकी हलविण्यासाठी ते रस्त्याच्या दिशेने जात असताना अचानक आकाशात विजांचा कडकडाट झाला. काही क्षणांतच वीज थेट त्यांच्या अंगावर कोसळली. विजेचा जोरदार तडाखा बसल्याने ते जागीच कोसळले. ही संपूर्ण घटना त्यांच्या आईसह शेतात काम करणाऱ्या महिला मजुरांनी पाहिली.
मुलाच्या अंगावर वीज कोसळल्याचे पाहताच आईने मदतीसाठी आक्रोश केला.तिचा हंबरडा ऐकून परिसरातील शेतकरी आणि नागरिक घटनास्थळी धावून आले. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या राकेश पाटील यांना तत्काळ उपचारासाठी अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
ही बातमी समजताच त्यांच्या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली. अचानक झालेल्या या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. रुग्णालय परिसरात आईचा आक्रोश आणि कुटुंबीयांचे दुःख पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. मेहनती, मनमिळावू आणि सर्वांना मदत करणारा तरुण शेतकरी अशी राकेश पाटील यांची ओळख होती.
गावातील सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचा सहभाग असायचा. त्यामुळे त्यांच्या अकाली निधनाने शहापूरसह परिसरातील नागरिकांमध्ये शोक व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. राकेश पाटील यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबाचा आधारवड हरपल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली. शासनाने पीडित कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत द्यावी,अशी मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
error: Content is protected !!