Home Breaking News आलापल्ली -सिरोंचा मार्गावरील मोसम व पुसूकपल्ली नाल्यांवरील पहिल्याच पावसात राष्ट्रीय महामार्ग ठप्प...
आलापल्ली -सिरोंचा मार्गावरील मोसम व पुसूकपल्ली नाल्यांवरील पहिल्याच पावसात राष्ट्रीय महामार्ग ठप्प ; कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह.
📍गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः मुख्यमंत्री असतानाही जिल्ह्यातील महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था दयनीयच असल्याचे चित्र.
सुकदर्शन वृतांत
आलापल्ली : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक,३५३ – सी वरील आलापल्ली – सिरोंचा मार्गावर पहिल्याच जोरदार पावसात वाहतूक व्यवस्था कोलमडली असून,मोसम व पुसूकपल्ली नाल्यांवरील अपूर्ण पुलांच्या कामामुळे तयार करण्यात आलेला तात्पुरता पर्यायी रस्ता वाहून गेला आहे.महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून वाहनचालक आणि प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः मुख्यमंत्री असतानाही जिल्ह्यातील महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था दयनीयच असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे.या मार्गावरील पुलांचे बांधकाम मागील सहा वर्षांपासून सुरू असून अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही. दरवर्षी पावसाळ्यात याच समस्येचा सामना करावा लागत असताना संबंधित यंत्रणा आणि कंत्राटदारांकडून कोणताही धडा घेतला जात नसल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये आहे.
कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही महामार्गाची अवस्था पहिल्याच पावसात उघडी पडल्याने कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.स्थानिकांच्या मते,कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे काम अत्यंत संथगतीने आणि निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. रेपनपल्ली परिसरात नुकतेच करण्यात आलेले डांबरीकरण उद्घाटनापूर्वीच उखडू लागल्याचे समोर आले आहे.
दुसरीकडे,मोसम आणि पुसूकपल्ली नाल्यांजवळ वाहतुकीसाठी उभारण्यात आलेला पर्यायी रस्ता केवळ माती टाकून तयार करण्यात आला होता. कोणतीही भक्कम संरचना किंवा दीर्घकालीन नियोजन न करता उभारण्यात आलेली ही व्यवस्था पहिल्याच मुसळधार पावसात वाहून गेली.या निष्काळजीपणाचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवासी, रुग्ण, विद्यार्थी आणि व्यापारी यांची मोठी गैरसोय होत आहे.
राष्ट्रीय महामार्गावर अशी परिस्थिती निर्माण होणे हे प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचे द्योतक असल्याची टीका स्थानिकांकडून होत आहे. दरवर्षी पावसाळ्यात हा मार्ग बंद पडत असतानाही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रशासनाने एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याऐवजी तातडीने काम पूर्ण करावे, अशी मागणी जोर धरत आहे.
मोसम व पुसूकपल्ली नाल्यांवरील पुलांचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून सुरक्षित आणि सक्षम पर्यायी वाहतूक व्यवस्था उभारावी, अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.
error: Content is protected !!