Home Breaking News धरणावर गेलेल्या दोन तरुण विद्यार्थिनींचा धरणाच्या जलाशयात बुडून दुर्दैवी अंत ; निसर्गाचा...
धरणावर गेलेल्या दोन तरुण विद्यार्थिनींचा धरणाच्या जलाशयात बुडून दुर्दैवी अंत ; निसर्गाचा आनंद ठरला काळ
📍स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात दुःखाचा डोंगर कोसळला.
सुकदर्शन वृतांत
यवतमाळ : पावसाळी पर्यटनाचा आनंद यवतमाळमधील दोन कुटुंबासाठी आयुष्यभराचे दुःखाश्रू ठरला आहे. निसर्गाचे सौंदर्य अनुभवण्यासाठी बोरगाव धरणावर गेलेल्या दोन तरुण विद्यार्थिनींचा धरणाच्या जलाशयात बुडून दुर्दैवी अंत झाला.पाण्यात घसरलेल्या मैत्रिणीला वाचवण्याच्या धाडसी, पण दुर्दैवी प्रयत्नात दुसऱ्या विद्यार्थिनीलाही आपला प्राण गमवावा लागला.
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण यवतमाळवर दुःखाचा डोंगर कोसळला.
अमृता अशोक खेडकर वय,२० वर्ष रा. महात्मा फुले कॉलेज समोर,धामणगाव रोड), मोहिनी गौत्रे वय,२० वर्ष रा.भोसा रोड) अशी या मृत विद्यार्थिनींची नावे आहेत. दोन्ही तरुणी यवतमाळ येथील वाधवानी फार्मसी महाविद्यालयात शिक्षण घेत होत्या.
शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास अमृता आणि मोहिनी आपल्या काही वर्गमित्रांसोबत यवतमाळ नजीकच्या बोरगाव धरणाच्या परिसरात फिरण्यासाठी गेल्या होत्या. पावसाळ्याच्या दिवसांत चहूकडे पसरलेली हिरवळ आणि भरलेले धरण यामुळे हा परिसर पर्यटकांना आकर्षित करतो.
सर्व मित्र-मैत्रिणी निसर्गाचा आनंद लुटत असताना अमृता आणि मोहिनी धरणाच्या काठावर अगदी पाण्याच्या जवळ गेल्या. मात्र, पाण्याचा आणि काठावरील निसरड्या भागाचा अंदाज न आल्याने अमृताचा अचानक पाय घसरला आणि ती थेट खोल पाण्यात कोसळली.
आपली मैत्रीण डोळ्यांसमोर पाण्यात बुडत असल्याचे दिसताच मोहिनीने क्षणाचाही विलंब न लावता तिला वाचवण्यासाठी हात पुढे केला. परंतु, पाण्याचा तीव्र प्रवाह, काठावरील चिखल आणि अमृताला बाहेर काढताना झालेली ओढाताण यामुळे मोहिनीचाही तोल गेला. काही क्षणांतच दोघीही खोल पाण्यात खेचल्या गेल्या.
त्यांच्यासोबत आलेल्या एका युवकाने प्रसंगावधान राखून तातडीने पाण्यात उडी घेतली. त्याने दोघींपर्यंत पोहोचून त्यांना बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला.पाण्याचा अथांग तळ आणि दोघींचे वजन यांमुळे त्या युवकाचे प्रयत्न अपुरे पडले. स्वतःचा जीव वाचवत अखेर त्याला हतबल होऊन काठावर परतावे लागले.
पालकांचा आक्रोश काळीज पिळवटणारा : –
घटनेची माहिती मिळताच यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि स्थानिक बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक गोताखोरांच्या मदतीने वेगाने शोधमोहीम राबवून दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच मुलींच्या पालकांनी धरणाकडे धाव घेतली.
आपल्या उमलत्या वयातील मुलींचे निष्प्राण देह पाहून पालकांनी केलेला आक्रोश उपस्थित सर्वांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठवले.
पावसाळ्याच्या दिवसांत धरणे, तलाव, नद्या आणि धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटनासाठी जाणाऱ्या तरुणाईने सुरक्षेची खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. पाण्याच्या खोलीचा, प्रवाहाचा अंदाज न घेता पाण्यात उतरणे किंवा धोकादायक निसरड्या काठांवर उभे राहणे जीवावर बेतू शकते.
एका क्षणाची असावधता दोन कुटुंबांचे हसतेखेळते आयुष्य उद्ध्वस्त करू शकते, याचे भान प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे पर्यटकांनी जलाशयाच्या परिसरात काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
error: Content is protected !!