Home Breaking News अहेरी – कमलापूर मार्गावर धावत्या ST बसचे चाक निखळले ; 20 दिवसांत...
अहेरी – कमलापूर मार्गावर धावत्या ST बसचे चाक निखळले ; 20 दिवसांत दुसरी घटना, प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
📍अवघ्या 20 दिवसांत अहेरी आगाराच्या बसचे चाक निखळण्याची ही दुसरी घटना
सुकदर्शन वृतांत
अहेरी : अहेरी – कमलापूर मार्गावर धावत्या एसटी बसचे चाक अचानक निखळल्याची धक्कादायक घटना 3 सप्टेंबर रोजी सकाळी 11:00 वा.च्या सुमारास घडली. चालकाने प्रसंगावधान राखत बस नियंत्रणात आणल्याने मोठी दुर्घटना टळली.विशेष म्हणजे,अवघ्या 20 दिवसांत अहेरी आगाराच्या बसचे चाक निखळण्याची ही दुसरी घटना आहे.
त्यामुळे आगारातील बसची तांत्रिक तपासणी आणि देखभाल नेमकी किती गांभीर्याने केली जाते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.यापूर्वी 13 ऑगस्ट रोजी मेळाराम जवळ अहेरी आगाराच्या धावत्या एसटी बसचे चाक निखळले होते. त्या बसमध्ये तब्बल 28 प्रवासी होते. बसचे निखळलेले चाक सुमारे 100 फूट अंतरावर जाऊन पडले होते.त्यावेळीही चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला होता.
अल्पावधीतच चाक निखळण्याच्या दोन घटना घडल्याने अहेरी आगारातील बसच्या देखभाल व्यवस्थेवर बोट ठेवले जात आहे. बस रस्त्यावर धावण्यासाठी सोडण्यापूर्वी चाक, नट – बोल्ट, टायर आणि अन्य महत्त्वाच्या यांत्रिक भागांची काटेकोर तपासणी केली जाते का ? असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
जिल्ह्यातील दुर्गम भागांसाठी एसटी बस ही दळणवळणाची प्रमुख साधन असून, हजारो प्रवासी दररोज एसटीवर अवलंबून असतात. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या असुरक्षित बसेस रस्त्यावर धावणे प्रवाशांच्या जीविताला धोकादायक ठरू शकते.
अहेरी आगारातील बसेसची तातडीने तांत्रिक तपासणी करून असुरक्षित वाहने सेवेतून बाजूला काढावीत, तसेच वारंवार घडणाऱ्या या घटनांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
error: Content is protected !!