Home Chandrapur टाटा ट्रस्ट व मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मूल येथे पाच...
टाटा ट्रस्ट व मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मूल येथे पाच दिवसीय EDP प्रशिक्षण संपन्न
📍25 महिलांना उद्योजकतेचे धडे; स्पोर्ट्स डे सेलिब्रेशनने कार्यक्रमात भरला उत्साह
सुकदर्शन वृतांत
मुल : (दिनांक,04/09/2026 शुक्रवार) ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने टाटा ट्रस्ट आणि मॅजिक बस इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लाईव्हलीहुड सेंटर(LRC) मूल येथे पाच दिवसीय उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम अर्थात EDP (Entrepreneurship Development Program) आयोजित करण्यात आला.
हा प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक,31 ऑगस्ट 2026 ते 4 सप्टेंबर 2026 या कालावधीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 31 ऑगस्ट 2026 रोजी स्पोर्ट्स डे सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले.यावेळी सहभागी महिलांसाठी विविध खेळ व मनोरंजक उपक्रम घेण्यात आले.
खेळाच्या माध्यमातून महिलांमध्ये संघभावना,नेतृत्वगुण, आत्मविश्वास,परस्पर सहकार्य आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.स्पोर्ट्स डे सेलिब्रेशनमुळे पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाला उत्साहपूर्ण सुरुवात झाली.
या प्रशिक्षणामध्ये मूल तालुक्यातील एकूण 25 महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला महिलांमध्ये उद्योजकतेची जाणीव निर्माण करणे,त्यांना स्वयंरोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन करणे तसेच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान,कौशल्य आणि आत्मविश्वास विकसित करणे हा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश होता.
सदर पाच दिवसीय प्रशिक्षण माननीय प्रविणा कुकडे, माननीय राहुल शिंदे तसेच चेतन पाटील यांनी दिले.प्रशिक्षणादरम्यान व्यवसायाची निवड,व्यवसाय सुरू करण्यापूर्वीचे नियोजन, बाजारपेठेचा अभ्यास,ग्राहकांच्या गरजा ओळखणे, उपलब्ध व्यवसायाच्या संधी,व्यवसाय व्यवस्थापन तसेच व्यवसाय यशस्वी करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
महिलांनी स्वतःच्या क्षमता ओळखून उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करून व्यवसाय कसा उभारावा, छोट्या व्यवसायापासून सुरुवात करून त्याचा विस्तार कसा करावा तसेच व्यवसायातील अडचणींवर मात करून यशस्वी उद्योजिका कसे बनावे,याबाबतही प्रशिक्षणादरम्यान मार्गदर्शन करण्यात आले.
या पाच दिवसीय EDP प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन प्रोजेक्ट मॅनेजर संदेश काळबांदे,मूल तालुक्यातील सेंटर मॅनेजर गणेश तुळसकर,ट्रेनिंग ऑफिसर वसंत पोटे तसेच शुभांगी रामगोनवार यांनी केले.
प्रशिक्षण कार्यक्रमाला मॅजिक बस इंडिया फाउंडेशनचे ट्रेनिंग ऑफिसर वैभव खरमणकर,सौरभ शेंडे,संगीता कावळे, सपना, राणी तसेच सोनाली यांची उपस्थिती लाभली. उपस्थितांनी सहभागी महिलांना भविष्यात स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहित केले.
टाटा ट्रस्ट आणि मॅजिक बस इंडिया फाउंडेशन यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील महिलांना उद्योजकतेच्या संधी उपलब्ध होत असून, स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वतःची आर्थिक ओळख निर्माण करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळत आहे.
लाईव्हलीहुड सेंटर,मूल येथे पार पडलेले हे पाच दिवसीय EDP प्रशिक्षण व स्पोर्ट्स डे सेलिब्रेशन महिलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरले.या प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून भविष्यात अनेक महिला यशस्वी उद्योजिका बनून स्वतःसह कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीत योगदान देतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
error: Content is protected !!