Monday, September 14, 2026
Home Breaking News चिमूर तालुक्यात मटणाच्या उरलेल्या भाजीवरून झालेल्या वादातून मोठ्या भावाने कुऱ्हाडीने वार करून...

चिमूर तालुक्यात मटणाच्या उरलेल्या भाजीवरून झालेल्या वादातून मोठ्या भावाने कुऱ्हाडीने वार करून लहान भावाची केली हत्या

चिमूर तालुक्यात मटणाच्या उरलेल्या भाजीवरून झालेल्या वादातून मोठ्या भावाने कुऱ्हाडीने वार करून लहान भावाची केली हत्या

सुकदर्शन वृतांत 
चिमूर : रक्षाबंधनाच्या निमित्ताने घरी आलेल्या बहिणीसाठी केलेल्या मटणाच्या बेतातील उरलेल्या भाजीवरून झालेला क्षुल्लक वाद सख्ख्या भावाच्या हत्येपर्यंत पोहोचला. दारूच्या नशेत संतापलेल्या मोठ्या भावाने लहान भावावर कुऱ्हाडीने प्राणघातक वार केल्याची थरारक घटना चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे बुधवारी सायंकाळी 7:30 वा.च्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
रमेश श्रीराम बनकर वय,55 वर्ष असे हत्या झालेल्या भावाचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचा मोठा भाऊ जगन श्रीराम बनकर वय,60 वर्ष याला भिसी पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगन, रमेश आणि त्यांचा दिव्यांग भाऊ किशोर हे तिघे भाऊ एकत्र राहत होते. रक्षाबंधनानिमित्त बहीण घरी आल्याने तिच्या स्वागतासाठी मटणाचा बेत करण्यात आला होता. बहीण राखी बांधून परतल्यानंतर सायंकाळी उरलेल्या मटणाच्या भाजीवरून जगन आणि रमेश यांच्यात वाद सुरू झाला.
दोघांनीही मद्यप्राशन केले असल्याने किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद काही वेळातच विकोपाला गेला. संतापलेल्या जगनने घरातील कुऱ्हाड हातात घेत रमेश यांच्या डोक्यावर आणि मानेवर प्राणघातक वार केले. गंभीर दुखापत झाल्याने रमेश रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच भिसी पोलिसांसह शंकरपूर चौकीतील पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला. त्यानंतर आरोपी जगन बनकर याला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली.किरकोळ कारणावरून सख्ख्या भावानेच भावाचा जीव घेतल्याने शंकरपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या प्रकरणाचा पुढील तपास भिसी पोलीस करीत आहेत.
error: Content is protected !!