Monday, September 14, 2026
Home Breaking News दक्षिण गडचिरोलीतील अहेरी व सिरोंचा परिसरात गुरुवारी पहाटे भूकंपाचा सौम्य धक्का  ३.६...

दक्षिण गडचिरोलीतील अहेरी व सिरोंचा परिसरात गुरुवारी पहाटे भूकंपाचा सौम्य धक्का  ३.६ रिश्टर तीव्रतेची नोंद ; नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण

दक्षिण गडचिरोलीतील अहेरी व सिरोंचा परिसरात गुरुवारी पहाटे भूकंपाचा सौम्य धक्का 

३.६ रिश्टर तीव्रतेची नोंद ; नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण

सुकदर्शन वृतांत 
गडचिरोली : अहेरी,सिरोंचा शहरासह दक्षिण गडचिरोलीतील परिसराला गुरुवारी पहाटे भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. पहाटेच्या सुमारास अचानक जमीन हादरल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या नोंदीनुसार या भूकंपाची तीव्रता ३.६ रिश्टर इतकी असून,भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून सुमारे १० किलोमीटर खोलीवर होता.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, ३ सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटे ५८ सेकंदांनी भूकंपाची नोंद झाली. त्याचे केंद्र १९.१०३ अंश उत्तर अक्षांश आणि ७९.९२९ अंश पूर्व रेखांशावर होते. हे ठिकाण तेलंगणातील करीमनगरच्या ईशान्येस सुमारे ११२ किलोमीटर अंतरावर असल्याचे केंद्राने नमूद केले आहे.
दक्षिण गडचिरोलीला भूकंपाचा धक्का जाणवण्याची ही पहिलीच घटना नाही. फेब्रुवारी २०२६मध्ये अहेरी, आलापल्ली आणि सिरोंचा परिसराला ३.९ रिश्टर तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला होता. त्यावेळी भूकंपाचे केंद्र तेलंगणातील मंचेरियाल जिल्ह्यात, रामगुंडमपासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर होते.
गेल्या पाच वर्षांतील या भागाला जाणवलेला हा पाचवा भूकंप असल्याने भूगर्भातील हालचालींचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. यापूर्वी ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी ४.३ रिश्टर, तर २९ ऑक्टोबर २०२२ रोजी ३.८ रिश्टर तीव्रतेचा भूकंप दक्षिण गडचिरोलीतील भागाला जाणवला होता. अहेरी, सिरोंचा आणि लगतच्या परिसरात या दोन्ही भूकंपांचे धक्के जाणवले होते.
गोदावरी खोऱ्यातील गडचिरोली-तेलंगणा सीमाभागात वारंवार जाणवणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे या परिसरातील भूगर्भीय हालचालींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.भूकंपानंतर नागरिकांनी घाबरून न जाता सावधगिरी बाळगावी,असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे
error: Content is protected !!