Friday, August 14, 2026
Home Breaking News कोरची – कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावरील बेडगाव घाटात भीषण अपघात ; ट्रक चा...

कोरची – कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावरील बेडगाव घाटात भीषण अपघात ; ट्रक चा ब्रेक फेल होऊन SUV चिरडली, तीन वाहने दुर्घटनाग्रस्त. 📍उदापूर (ब्रम्हपुरी) येथील डोक्याला गंभीर दुखापत सात टाके लागल्याने कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू.

0
19

कोरची – कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावरील बेडगाव घाटात भीषण अपघात ; ट्रक चा ब्रेक फेल होऊन SUV चिरडली, तीन वाहने दुर्घटनाग्रस्त.

📍उदापूर (ब्रम्हपुरी) येथील डोक्याला गंभीर दुखापत सात टाके लागल्याने कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू.

सुकदर्शन वृतांत 
कोरची : कोरची – कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावरील बेडगाव घाटात बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास भीषण अपघात घडला. छत्तीसगडहून कुरखेडाकडे येणाऱ्या मालवाहू ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने ट्रकने समोरून येणाऱ्या महिंद्रा XUV300 कारला जोरदार धडक दिली.
धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघातात आणखी एक टाटा पंच कारही धडकेच्या चपेटीत आली,तर ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला.एवढ्या मोठ्या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
मिळालेल्या माहितीनुसार, घाटातील चढावर एक ट्रक बंद पडून उभा असताना उतारावरून येणाऱ्या CG-07 BK-8413 क्रमांकाच्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले. ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या महिंद्रा XUV300 (MH-33 AD – 3681) ला जोरदार धडक दिली. धडकेनंतर कार दोन ट्रकाच्या मध्ये अडकून पूर्णपणे चकनाचूर झाली.
या कारमधून कुरखेडा येथील कंत्राटदार रामसुख चोयल हे मित्र प्रमोद मेश्राम यांच्या कुटुंबीयांना शालेय प्रवेशासाठी राजनांदगाव येथे घेऊन जात होते. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले.
अपघातात टाटा पंच (MH-31 GG-3162) मधील माणिक कवडू मेश्राम वय,५७ रा.उदापूर,ब्रह्मपुरी जिल्हा. चंद्रपूर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना सात टाके पडले आहेत. त्यांच्यावर कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली.
अपघातानंतर ट्रकमधील लोखंडी सळ्या रस्त्यावर विखुरल्या,तर डिझेलची टाकी फुटल्याने मोठ्या प्रमाणात डिझेल रस्त्यावर सांडले. त्यामुळे काही काळ स्फोटाची भीती निर्माण झाली होती. मात्र, नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच पुराडा येथील सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र म्हैसकर यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्त वाहने हटवून काही वेळातच घाटातील वाहतूक पूर्ववत करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
बेडगाव घाटात वारंवार अपघात होत असून अनेकांना यापूर्वी जीव गमवावा लागला आहे. तीव्र चढ-उतार, अरुंद रस्ता, वाहून गेलेला मुरूम, वारंवार बंद पडणारी अवजड वाहने आणि अपुऱ्या सुरक्षाव्यवस्थेमुळे हा घाट धोकादायक बनला आहे. रस्त्याचे रुंदीकरण, संरक्षक कठडे आणि पर्यायी मार्गाची मागणी नागरिकांकडून वारंवार होत असली तरी अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही.
त्यामुळे ” आणखी किती अपघात झाल्यावर प्रशासन जागे होणार ? ” असा संतप्त सवाल वाहनचालक आणि स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!