Home Gadchiroli लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त गडचिरोलीत प्रेरणादायी कार्यक्रम ; विचारप्रबोधनासह...
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त गडचिरोलीत प्रेरणादायी कार्यक्रम ; विचार प्रबोधनासह फळांचे वाटप.
सुकदर्शन वृतांत
गडचिरोली : दि.01 ऑगस्ट 2026 समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना, महाराष्ट्र राज्य तथा समता संघर्ष समाज विकास बहुउद्देशीय शिक्षण प्रशिक्षण संस्था, गोकुळ नगर,वॉर्ड क्र. 09, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने,
विविध समाजबांधवांच्या उत्स्फूर्त सहभागातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त आज दि. 01 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6.30 वाजता गडचिरोली येथे अत्यंत उत्साहपूर्ण, प्रेरणादायी आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या वातावरणात जयंती सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण पत्रुजी मोहुर्ले प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहिली.
यावेळी लक्ष्मण मोहुर्ले यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनप्रवास, साहित्यसंपदा, सामाजिक न्यायासाठी दिलेले योगदान, श्रमिक, कष्टकरी, दलित, वंचित आणि उपेक्षित समाजाच्या उन्नतीसाठी केलेले अथक कार्य यावर सखोल मार्गदर्शन केले.
त्यांनी सांगितले की, ” अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते,तर सामाजिक परिवर्तनाचे महान योद्धे होते. त्यांच्या लेखणीतून समाजाला स्वाभिमान, समता, बंधुता आणि न्यायाचा संदेश मिळाला.त्यांच्या विचारांचे आचरण हेच त्यांना खरी आदरांजली ठरेल. ” कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना भारतीय संविधानातील समता, सामाजिक न्याय आणि मानवतेच्या मूल्यांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
युवकांनी शिक्षण, संघटन आणि सामाजिक जबाबदारी स्वीकारून समाज परिवर्तनाच्या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.जयंतीनिमित्त उपस्थित नागरिकांना फळांचे वाटप करण्यात आले.या उपक्रमातून समाजात प्रेम, बंधुभाव, सेवा आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमास विविध समाजातील नागरिक, युवक-युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांवर श्रद्धा असलेल्या अनेक मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. उपस्थितांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा तसेच सामाजिक समता, शिक्षण आणि संविधानिक मूल्यांच्या प्रसारासाठी सातत्याने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाचे आयोजन समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना, महाराष्ट्र राज्य तथा समता संघर्ष समाज विकास बहुउद्देशीय शिक्षण प्रशिक्षण संस्था,गोकुळ नगर,वॉर्ड क्र.09, गडचिरोली यांच्या वतीने करण्यात आले असून उपस्थितांनी कार्यक्रमाचे कौतुक करून आयोजकांचे अभिनंदन केले.
error: Content is protected !!