Home Chandrapur चिमूर तालुक्यातील मालेवाडा परिसरात वाघाचा हल्ला ; गुराखी गंभीर जखमी.
चिमूर तालुक्यातील मालेवाडा परिसरात वाघाचा हल्ला ; गुराखी गंभीर जखमी.
सुकदर्शन वृतांत
चिमुर : चिमूर तालुक्यातील मालेवाडा गावालगतच्या जांभूळघाट परिसरात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या एका गुराख्यावर पट्टेदार वाघाने अचानक हल्ला केल्याची घटना बुधवारी (२९ जुलै) सायंकाळी चारच्या सुमारास घडली.या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मालेवाडा येथील दशरथ शत्रुघ्न जिवतोडे वय,४५ वर्ष हे गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावरील जांभूळघाट परिसरातील झुडपी जंगलात जनावरे चारण्यासाठी गेले होते. यावेळी झुडपात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घातली. या हल्ल्यात त्यांच्या मानेवर आणि उजव्या हातावर गंभीर जखमा झाल्या.
घटनेनंतर त्यांच्या आरडाओरड्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक आणि इतर गुराखी धावून आले. त्यांनी तातडीने जखमी दशरथ जिवतोडे यांना चिमूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृतीवर वैद्यकीय देखरेख ठेवण्यात आली आहे.
या घटनेनंतर मालेवाडा व जांभूळघाट परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने घटनास्थळी पाहणी करून नागरिकांनी जंगल परिसरात किंवा जनावरे चारण्यासाठी जाताना सावधगिरी बाळगावी, एकट्याने जंगलात जाऊ नये तसेच वाघ दिसल्यास तत्काळ वन विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे.
error: Content is protected !!