Home Chandrapur पोटेगाव परिसरात अतिवृष्टीचा कहर ; २० ते २५ गावांचा संपर्क तुटला, नागरिकांना...
पोटेगाव परिसरात अतिवृष्टीचा कहर ; २० ते २५ गावांचा संपर्क तुटला, नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन.
सुकदर्शन वृतांत
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पोटेगाव परिसरात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. गुरुवार (दि.३० जुलै) रोजी रात्री सुमारे १० वाजल्यापासून सुरू झालेल्या वादळी वाऱ्यासह संततधार पावसामुळे पोटेगाव परिसरातील सुमारे २० ते २५ गावांचा संपर्क तुटला असून अनेक रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले आहेत.
सतत सुरू असलेल्या पावसामुळे नद्या व नाल्यांना पूर आला असून पुलांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. त्यामुळे वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला असून अनेक ठिकाणी वाहनांची ये-जा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या पोटेगाव – घोट, पोटेगाव – राजोली,पोटेगाव – कुनघाडा तसेच पोटेगाव – गडचिरोली हे प्रमुख मार्ग पाण्याखाली गेल्याने पूर्णपणे बंद झाले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक,शेतकरी, विद्यार्थी आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक गावांमध्ये दैनंदिन जीवन ठप्प झाले असून अत्यावश्यक सेवांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सतत वाढणाऱ्या पावसामुळे नदी-नाल्यांतील पाण्याची पातळी धोकादायकरीत्या वाढत आहे. काही ठिकाणी पुलांवरून वेगाने पाणी वाहत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत पूरग्रस्त रस्ते किंवा पुल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पोलिस मदत केंद्र,पोटेगाव यांनी नागरिकांना विशेष सतर्कतेचा इशारा दिला असून वाहनचालक, प्रवासी, शेतकरी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये,पूरग्रस्त भागात जाणे टाळावे आणि अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हवामानातील परिस्थिती लक्षात घेता पुढील काही तासांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी बाळगून सुरक्षित ठिकाणी राहावे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ स्थानिक प्रशासन किंवा पोलिसांशी संपर्क साधावा,असेही प्रशासनाने सांगितले आहे.
error: Content is protected !!