Home Breaking News एटापल्ली तालुक्यातील पिपली (बुर्गी) उपपोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुंडम गावाजवळ पत्रके – बॅनर...
एटापल्ली तालुक्यातील पिपली (बुर्गी) उपपोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुंडम गावाजवळ पत्रके – बॅनर आढळल्याने खळबळ.
📍खाण प्रकल्पांना पुन्हा विरोध,कंपन्यांना धमकी.
सुकदर्शन वृतांत
एटापल्ली : जिल्ह्यात नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्याचा दावा केला जात असतानाच एटापल्ली तालुक्यात रविवारी दोन ठिकाणी नक्षलवादी आशयाचे बॅनर आणि पत्रके आढळून आल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
खाण प्रकल्पांशी संबंधित चार कंपन्यांना विरोध दर्शविताना स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनाही इशारा देण्यात आल्याने परिसरात पुन्हा एकदा नक्षलवादी हालचालींची चर्चा सुरू झाली आहे.
एटापल्ली तालुक्यातील पिपली बुर्गी उपपोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुंडम गावाजवळ रविवारी दोन ठिकाणी नक्षलवादी आशयाचे बॅनर आणि पत्रके आढळून आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बॅनर व पत्रके जप्त केली. या घटनेनंतर छत्तीसगड सीमेवरील परिसरात सुरक्षा वाढविण्यात आली असून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
राज्य सरकारने गडचिरोलीला ‘स्टील हब’ म्हणून विकसित करण्याचे धोरण स्वीकारल्यानंतर जिल्ह्यात विविध खाण प्रकल्पांना वेग आला आहे.एटापल्ली परिसरातही लोहखनिजाच्या साठ्यांची गुणवत्ता तपासणी आणि सर्वेक्षण सुरू आहे.
अशा पार्श्वभूमीवर समोर आलेल्या पत्रकांत ओमसाई,नॅचरल,सनफ्लॉवर आणि जेएसडब्ल्यूसह चार कंपन्यांचा नामोल्लेख करून त्यांचे काम तातडीने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.तसेच हेटळकसा – कुदरी – मोहरली परिसरात सुरू असलेल्या ड्रोन सर्वेक्षणालाही नक्षलवाद्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
पत्रकांमध्ये जल, जंगल आणि जमीन धोक्यात आल्याचा दावा करत स्थानिक नागरिकांना आंदोलनासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. खाण प्रकल्पांमुळे आदिवासींच्या हक्कांवर गदा येत असून भविष्यात स्थानिक तरुणांचे अस्तित्व धोक्यात येईल,असा आरोप करण्यात आला आहे.
संबंधित कंपन्यांना सहकार्य करणारे सरपंच, पटेल आणि ग्रामस्थांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही पत्रकातून देण्यात आला आहे.
अलीकडील काळात सुरक्षा दलांच्या कारवायांमुळे नक्षलवाद्यांच्या हालचालींवर मोठ्या प्रमाणात अंकुश आल्याचा दावा केला जात असतानाच पुन्हा एकदा अशा प्रकारचे बॅनर आणि पत्रके आढळल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पोलिसांनी जप्त केलेल्या बॅनर आणि पत्रकांची तपासणी सुरू असून त्यामागील सत्यता आणि संबंधितांचा शोध घेतला जात आहे.पिपली बुर्गी परिसरात आढळलेल्या बॅनर आणि पत्रकांची चौकशी सुरू आहे. ते खरोखर नक्षलवाद्यांनीच लावले आहेत का, याची खातरजमा केली जाईल.” – एम.रमेश,पोलीस अधीक्षक, गडचिरोली
error: Content is protected !!