Home Breaking News रेती उपशाच्या जुन्या वादातून भाजपा नेत्यासह तिघांची पेट्रोल ओतून पेटवून अत्यंत क्रूरपणे...
रेती उपशाच्या जुन्या वादातून भाजपा नेत्यासह तिघांची पेट्रोल ओतून पेटवून अत्यंत क्रूरपणे हत्या ; एक जखमी.
सुकदर्शन वृतांत
कोरिया (छत्तीसगड) : एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी (१६ जून)) कोरिया जिल्ह्यात रेती उपशाच्या जुन्या वादातून भाजपा नेत्यासह तिघांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली.
फॉर्च्युनर कारला ट्रकच्या साहाय्याने कोंडीत पकडून,त्यावर पेट्रोल ओतून पेटवून देण्यात आली.या आगीत भाजपा नेते आणि माजी जनपद पंचायत अध्यक्ष भारत सिंह (उर्फ लल्ला सिंह) यांच्यासह तिघांचा मृत्यू झाला आहे.
या प्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.तर, फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.मृत भारत सिंह यांच्या कुटुंबीयांनी रेती उपशाच्या जुन्या वादातून ही घटना घडल्याचा आरोप केला.
भारत सिंह तडजोड करण्यासाठी गेले होते.आधीच सापळा रचण्यात आला होता, असाही आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत अक्षत त्रिपाठी, विशाल त्रिपाठी, सत्यप्रकाश त्रिपाठी आणि मन्नू त्रिपाठी यांना अटक केली आहे.
इतरांचा शोध सुरु आहे.या घटनेमुळे कोरिया जिल्ह्यात तणावाचे वातावरण असून,मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.समोर आलेल्या माहितीनुसार, मृत भारत सिंह यांना रेती उपशाचे कंत्राट मिळाले होते.
पण, यानंतर सोनहत, कैलासपूर, तेलीमुडा, बेलिया आणि छिंगुरा परिसरात रेती वाहतूक आणि अवैध वसुलीवरून वाद सुरू झाला.भारत सिंह यांचा गट आणि भाजपा नेते मनोज त्रिपाठी यांचे कुटुंब यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून हा वाद धुमसत होता.
पैशांचे व्यवहार आणि रेतीच्या वर्चस्वावरून दोन्ही गटांतील वाद वाढला आणि त्याचे रूपांतर संघर्षात झाले. मंगळवारी भारत सिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांची कार घेरण्यात आली आणि कारवर पेट्रोल टाकून जाळण्यात आले.
या आगीत भारत सिंह यांचा गाडीतच होरपळून मृत्यू झाला. तर, वीरेंद्र सिंह यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि भारत यांचे चुलत भाऊ नागेंद्र सिंह यांचाही मृत्यू झाला. या आगीत मयांक सिंह हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर बिलासपूरच्या अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृत भारत सिंह हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते, परंतु भूपेश बघेल सरकारच्या काळात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, सिंह यांच्या कुटुंबाने या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.रेती खदाणीच्या जुन्या वादातून ही घटना घडल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरेशा चौबे यांनी सांगितले.
error: Content is protected !!