Saturday, September 12, 2026
Home Breaking News मजुरांचा घेऊन तेलंगणाकडे जाणाऱ्या पिकअपला ट्रकची भीषण धडक होऊन 6 जणांचा मृत्यू...

मजुरांचा घेऊन तेलंगणाकडे जाणाऱ्या पिकअपला ट्रकची भीषण धडक होऊन 6 जणांचा मृत्यू तर 7 जण गंभीर जखमी

मजुरांचा घेऊन तेलंगणाकडे जाणाऱ्या पिकअपला ट्रकची भीषण धडक होऊन 6 जणांचा मृत्यू तर 7 जण गंभीर जखमी

सुकदर्शन वृतांत 
गोंदिया : रोजगाराच्या शोधात तेलंगणाकडे निघालेल्या मजुरांवर नागरा परिसरात काळाने घाला घातला. गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा – मोहरानटोली परिसरात ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर भीषण धडक होऊन 6 जणांचा मृत्यू,तर 7 जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरड्याचाही समावेश असल्याने या दुर्घटनेने गोंदिया आणि बालाघाट परिसर सुन्न झाला आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर हा अपघात झाल्याची माहिती आहे.
गोंदिया कडून येणाऱ्या भरधाव ट्रकची कामगारांना घेऊन जाणाऱ्या पिकअपला जोरदार धडक बसली. धडक इतकी प्रचंड होती की पिकअप वाहनाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. वाहनातील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांसह गोंदिया ग्रामीण पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.
या दुर्घटनेत आरुष मात्रे वय,3 वर्ष, किरण संतोष वैद्य वय,26 वर्ष,संतोष मात्रे वय,38 वर्ष, सुशिला मात्रे वय,35 वर्ष,रुपसेन सत्यकर वय,35 वर्ष आणि ज्योती सत्यकर वय,32 वर्ष यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सर्व मृतक मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील विविध भागांतील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले.
भुमेश्वर मात्रे, संगीता मात्रे, राजेंद्र पंचाले,लक्ष्मी पंचाल, संतोष वैद्य, राकेश बाहे आणि चालक संदीप बाहे हे जखमी झाले असून त्यांच्यावर गोंदिया येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते.
बालाघाट जिल्ह्यातील हे कामगार रोजगारासाठी तेलंगणाकडे निघाले होते. हाताला काम आणि कुटुंबाला आधार मिळेल,या आशेने सुरू झालेला प्रवास नागराजवळ शोकांतिकेत संपला. एका क्षणात कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
अपघाताची नोंद गोंदिया ग्रामीण पोलिसांनी केली असून पोलीस निरीक्षक वैभव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.अपघात नेमका कोणाच्या निष्काळजी पणामुळे झाला,याचा तपास करण्यात येत आहे. मृतदेहांचे शवविच्छेदन जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात येत असून, या भीषण दुर्घटनेने रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
error: Content is protected !!