Home Gadchiroli आमची अंगणवाडी – आपली जबाबदारी पेंढरी येथे पोषण अभियानाचा उत्साहात शुभारंभ 📍कुपोषणमुक्त...
आमची अंगणवाडी – आपली जबाबदारी पेंढरी येथे पोषण अभियानाचा उत्साहात शुभारंभ
📍कुपोषणमुक्त गावासाठी विभागीय समन्वय व समुदाय सहभागाचा संकल्प
सुकदर्शन वृतांत
धानोरा : पेंढरी,दि. ४ सप्टेंबर २०२६ पोषण अभियानाच्या निमित्ताने पेंढरी येथील गोटुलमध्ये “ आमची अंगणवाडी – आपली जबाबदारी ” या संकल्पनेतून पोषण अभियान कार्यक्रमाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला.बालकांचे आरोग्य व पोषण,गर्भवती व स्तनदा मातांचे आरोग्य तसेच किशोरवयीन मुलींच्या पोषणविषयक गरजा याकडे विशेष लक्ष देत कुपोषण निर्मूलनासाठी विविध विभागांच्या समन्वयातून काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमास धानोरा पंचायत समितीचे BDO श्री.रोशन कुमार दुबे, CDPO सौ. नीलिमा गेडाम, CRY गडचिरोलीचे प्रकल्प समन्वयक श्री.अंकुश राठोड, सिनियर ट्रेनर श्री.कृष्णकांत घोगरे,CRY जारावंडीचे श्री. संघदीप खोब्रागडे तसेच मातृवंदना योजना, धानोरा येथील CKD श्री.नितेश सिडाम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी धानोरा बिटमधील अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व आशा सेविका उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात श्री.अंकुश राठोड यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून पोषण अभियानाचे महत्त्व,उद्दिष्टे आणि कार्यक्रमाचा अजेंडा याबाबत माहिती दिली. पोषण हा केवळ एका विभागाचा विषय नसून, बालक, माता आणि किशोरवयीन मुलींच्या पोषणासाठी आरोग्य विभाग, महिला व बाल विकास विभाग,अंगणवाडी, आशा कार्यकर्त्या, कुटुंब आणि समुदाय यांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यानंतर CDPO कु. नीलिमा गेडाम यांनी अंगणवाडी सेविकांच्या भूमिका व जबाबदाऱ्यांवर मार्गदर्शन केले. बालकांचे नियमित वाढ मापन, पोषणविषयक माहिती, लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचविणे तसेच अंगणवाडीच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे यामध्ये अंगणवाडी सेविकांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रूट मॅपच्या माध्यमातून नियोजनबद्ध पद्धतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याबाबत त्यांनी सविस्तर माहिती व सूचना दिल्या.
BDO श्री. रोशन कुमार दुबे यांनी AAA म्हणजे आशा, ANM आणि अंगणवाडी यांच्या भूमिका व जबाबदाऱ्यांवर सखोल मार्गदर्शन केले. गावातील आरोग्य व पोषणविषयक समस्या वेळेत ओळखून त्यावर योग्य कार्यवाही करण्यासाठी AAA मध्ये नियमित संवाद व समन्वय असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
कुपोषणाची कारणे, कुपोषित बालकांची वेळेवर ओळख, त्यांचे नियमित निरीक्षण आणि आवश्यक आरोग्यसेवांशी जोडणी याबाबत त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.CKD श्री. नितेश सिडाम यांनी मातृवंदना योजनेबाबत सविस्तर माहिती दिली.योजनेचा उद्देश, लाभार्थी, योजनेच्या अंमलबजावणीतील विविध त्रुटी व अडचणी यावर त्यांनी मार्गदर्शन केले.
तसेच माता व बालकांच्या पोषण स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी मातृवंदना योजना आणि पोषण अभियान यांच्यातील समन्वयाचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.यानंतर पोषण अभियानाचे पाच प्रमुख जीवनदायी मुद्दे म्हणजेच पंचसूत्री याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. पहिले १,००० दिवस या मुद्द्यांतर्गत गर्भधारणेपासून बाळाच्या दुसऱ्या वर्षापर्यंत माता व बालकाची योग्य काळजी आणि पोषण यांचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले.
ॲनिमिया मुक्ती अंतर्गत आयर्न-फॉलिक ॲसिडच्या गोळ्या, जंतनाशक गोळ्या आणि आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करून रक्तक्षय टाळण्याचा संदेश देण्यात आला. स्वच्छ हात आणि स्वच्छता या मुद्द्यांतर्गत जेवणापूर्वी व शौचानंतर साबणाने हात धुणे,स्वच्छ पाणी वापरणे आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
पौष्टिक व वैविध्यपूर्ण आहार यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी यांसारखी स्थानिक तृणधान्ये, डाळी, शेंगदाणे, तेल आणि स्थानिक भाज्यांचा रोजच्या आहारात समावेश करण्याबाबत माहिती देण्यात आली. तसेच वाढीवर नियमित देखरेख या मुद्द्यांतर्गत अंगणवाडीत दरमहा बालकांचे वजन व उंची मोजून पोषण ट्रॅकरवर नोंद करणे आणि तीव्र कुपोषित बालकांना VCDC किंवा NRC येथे तात्काळ उपचारासाठी पाठविण्याचे महत्त्व सांगण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा सेविकांशी संवाद साधून गावातील कुटुंबांपर्यंत पोषणविषयक संदेश पोहोचविणे, बालकांची नियमित वाढ तपासणे, गर्भवती व स्तनदा मातांना योग्य पोषणविषयक मार्गदर्शन करणे आणि गरजू लाभार्थ्यांना आवश्यक सेवांशी जोडणे यावर भर देण्यात आला.
“आमची अंगणवाडी – आपली जबाबदारी ” या संकल्पनेतून अंगणवाडी ही केवळ शासकीय सेवा देणारी जागा नसून, गावातील बालक, माता आणि कुटुंबांच्या आरोग्य व पोषण सुधारण्याचे महत्त्वाचे केंद्र आहे, असा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला. अंगणवाडीच्या कामात समुदायाचा सहभाग वाढवून पोषणविषयक उपक्रमांना लोकचळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी CRY गडचिरोलीचे सिनियर ट्रेनर श्री.कृष्णकांत घोगरे यांनी आभार प्रदर्शन केले.त्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शन करणाऱ्या सर्व मान्यवरांचे तसेच अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व आशा सेविकांचे आभार मानले.
पेंढरी येथील गोटुलमध्ये झालेल्या या कार्यक्रमामुळे पोषण अभियानाला गावपातळीवर सकारात्मक सुरुवात झाली असून, कुपोषण निर्मूलन, माता-बाल आरोग्य सुधारणा, रक्तक्षय प्रतिबंध, स्थानिक पौष्टिक आहाराचा प्रसार आणि स्वच्छतेच्या सवयी वाढविण्यासाठी विविध विभाग व समुदाय यांच्या समन्वयातून पुढील उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
“ आमची अंगणवाडी – आपली जबाबदारी ” या संदेशातून प्रत्येक कुटुंबाने आणि समुदायाने पोषणाची जबाबदारी स्वीकारल्यास सुपोषित बालक, निरोगी माता आणि पोषणक्षम गाव निर्माण करण्याचे उद्दिष्ट साध्य होऊ शकते,असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
error: Content is protected !!