प्रसुतीसाठी चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्या बाळासह मातेचाही मृत्यू ; आरोग्य व्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण
📍गरीब रुग्णांची हेळसांड केव्हा थांबणार ? पतीकडून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचा आरोप
सुकदर्शन वृतांत
गडचिरोली : प्रसुतीसाठी चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्या 27 वर्षीय महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाला. तिच्या बाळाचाही जन्मानंतर काही मिनिटांतच मृत्यू झाला.वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. 23 ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेमुळे चामोर्शीतील आरोग्य व्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जामगिरी (ता.चामोर्शी) येथील जिजा हंसराज सातर यांना पहिल्या प्रसूतीसाठी २३ ऑगस्ट रोजी पहाटे चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रसूतीकळा सुरू असतानाही सकाळी साडेदहा वाजेपर्यंत स्त्रीरोगतज्ज्ञ उपलब्ध नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. उपस्थित परिचारिकांकडे चौकशी केली असता, त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात आले, असा दावा नातेवाइकांनी केला.
विशेष म्हणजे, चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दोन स्त्रीरोगतज्ज्ञांची नियुक्ती असतानाही दोघांपैकी एकही डॉक्टर त्या वेळी उपस्थित नव्हता, असा आरोप करण्यात आला आहे. साडेदहा वाजण्याच्या सुमारास जिजा यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना महिला व बाल रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर पावणेबारा वाजता प्रसूती झाली. मात्र, जन्मानंतर काही मिनिटांतच नवजात बाळाचा मृत्यू झाला.
बाळाच्या मृत्यूच्या धक्क्यातून कुटुंबीय सावरत असतानाच जिजा यांची प्रकृती अधिक गंभीर झाली. त्यांना रक्तस्राव सुरू झाला, तसेच रक्तदाब वाढल्याचे सांगण्यात आले. प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.उपचार सुरू असतानाच रात्री साडेनऊच्या सुमारास जिजा सातर यांनीही अखेरचा श्वास घेतला.
पहिल्यांदा आई होण्याच्या आशेने रुग्णालयात दाखल झालेल्या जिजा आणि त्यांच्या नवजात बाळाचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने सातर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
माजी पंचायत समिती सदस्या अमिता मडावी यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ही केवळ प्रसूतीतील गुंतागुंत नसून, वेळेवर उपचार न मिळाल्याने निर्माण झालेल्या प्रशासकीय हलगर्जीपणाचा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला.सिझेरियनची आवश्यकता होती का, असल्यास त्याबाबत वेळेत निर्णय का झाला नाही,डॉक्टर वेळेवर का उपलब्ध नव्हते आणि रुग्णाला एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याची वेळ का आली,असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
या प्रकरणी चामोर्शी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रवीण किलनाके आणि महिला व बाल रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.माधुरी किलनाके यांच्यावर निष्काळजीपणाचा आरोप करीत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी,अशी मागणी मडावी यांनी केली आहे.संबंधित डॉक्टर आणि परिचारिकांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.
या प्रकरणात आणखी एक गंभीर आरोप नातेवाइकांनी केला आहे. जिजा यांचे पती हंसराज सातर यांच्याकडून कोऱ्या कागदावर सह्या घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. पत्नी आणि नवजात बाळाला गमावल्याच्या दु:खात असलेल्या कुटुंबीयांशी करण्यात आलेल्या कथित असंवेदनशील वर्तनामुळे नातेवाइकांनी संताप व्यक्त केला.
ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणात निष्काळजीपणा झाला किंवा नाही, हे चौकशीतून स्पष्ट होईल.दोष आढळल्यास संबंधितांवर योग्य ती प्रशासकीय कारवाई केली जाईल,असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.वर्षा लहाडे यांनी सांगितले.