Home Breaking News उपचार न मिळाल्याने मृत्यू,नंतर शवविच्छेदनासाठी तब्बल १४ तास ताटकळत ठेवले ; रुग्णालयांची...
उपचार न मिळाल्याने मृत्यू,नंतर शवविच्छेदनासाठी तब्बल १४ तास ताटकळत ठेवले ; रुग्णालयांची टोलवाटोलवी आणि मृतदेहाची विटंबना.
📍महिलेवर मृत्यूनंतरही अहेरीत अन्यायाची परिसीमा.
सुकदर्शन वृतांत
अहेरी : आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार आणि प्रशासकीय अनास्थेमुळे एका गरोदर महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मृत्यूच्या तावडीतून सुटका न झालेल्या या महिलेला मृत्यूनंतरही तब्बल १४ तास शवविच्छेदनासाठी ताटकळत राहावे लागल्याने नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास जन्नी पुसू नैताम या महिलेला प्रसूतीकळा सुरू झाल्याने भामरागड येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथे पुरेशा सोयी-सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तातडीने अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात रेफर (संदर्भित) केले. दुर्दैवाने, अहेरी येथे पोहोचण्यापूर्वीच वाटेतच त्या महिलेची प्राणज्योत मालवली.
रुग्णालयांची टोलवाटोलवी आणि मृतदेहाची विटंबना : –
महिलेस मृत घोषित केल्यानंतर तिचे शव अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे शवविच्छेदन करणारा डॉक्टर उपलब्ध नसल्याचे सांगत रुग्णालयाने मृतदेह अहेरी उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. उपजिल्हा रुग्णालयाने सदर महिलेचे शव शवविच्छेदन गृहात ठेवले पण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी ‘हे प्रकरण महिला व बाल रुग्णालयाचे आहे’ असा तांत्रिक अडसर उभा करत शवविच्छेदन करण्यास थेट नकार दिला.
दोन रुग्णालयांच्या या असंवेदनशील टोलवाटोलवीमुळे रात्री १२ वाजेपासून तब्बल १२ तास त्या दुर्दैवी महिलेचा मृतदेह रुग्णालयात पडून राहिला. मृत्यूनंतरही झालेल्या या अन्यायामुळे नातेवाईक आणि नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला.
पत्रकारांच्या मध्यस्थीनंतर चक्रे हलली या संतापजनक प्रकाराची माहिती मिळताच पत्रकार जावेद अली आणि सहकाऱ्यांनी आज 12 च्या सुमारास तातडीने जिल्हा शल्य चिकित्सकांशी फोनवरून संपर्क साधून घडलेला गंभीर प्रकार निदर्शनास आणून दिला.
त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी विशेष डॉक्टरांची टीम अहेरीला रवाना केली. मात्र, या प्रक्रियेलाही विलंब होत असल्याचे पाहून अखेर दुपारी २ वाजेच्या सुमारास अहेरी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू केली.
ग्रामीण भागातील ढिसाळ आरोग्य सेवा आणि डॉक्टरांच्या या बेजबाबदार वृत्तीमुळे जन्नी नैताम यांना वेळेवर उपचार तर मिळालेच नाहीत, पण मृत्यूनंतरही त्यांची नाहक विटंबना झाली, असा घणाघाती आरोप आता स्थानिक जनतेतून केला जात आहे.
मातेच्या मृत्यूबाबतचा सविस्तर खुलासा व घटनाक्रम : –
१. प्राथमिक माहिती
मातेचे नाव : जैनी पुसू नैताम
पत्ता : मु.चिचोडा,तालुका भामरागड
गर्भधारणा तपशील : खेप ५ वी (Gravida 5)
२.घटनाक्रम (Timeline of Events)
दिनांक ०६/०८/२०२६ ANM यांच्या नियमित भेटीदरम्यान मातेला उच्च रक्तदाब (High BP) असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तिला तातडीने ग्रामीण रुग्णालय (RH) भामरागड येथे हलविण्यात आले. तेथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी तिला पुढील उच्च-स्तरीय उपचारासाठी महिला रुग्णालय (WH) अहेरी येथे संदर्भित (Refer) करण्यास सांगितले होते.
समुपदेशन व नकाराची नोंद –
ANM आणि RH मधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मातेचे व तिच्या पतीचे योग्य ते समुपदेशन केले.परंतु, मातेने व तिच्या पतीने अहेरी येथे जाण्यास स्पष्ट नकार दिला आणि ते घरी परतले. त्यानंतर त्यांच्या घरीच उपचार सुरू ठेवण्यात आले होते.
दिनांक ११/०८/२०२६ (रात्रीची घटना) रात्रीच्या वेळी अचानक मातेच्या पोटात तीव्र दुखू लागल्यामुळे कुटुंबियांनी ANM शी संपर्क साधला.ANM ने कोणतीही दिरंगाई न करता तात्काळ रुग्णवाहिका (Ambulance) बोलावून मातेला RH भामरागड येथे आणले.
रुग्णालयात पोहचल्यानंतर मातेची प्रकृती सातत्याने खालावत चालल्याचे निदर्शनास आले. यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तिला तात्काळ WH अहेरी येथे संदर्भित केले, परंतु रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला.या प्रकरणात ANM आणि आरोग्य यंत्रणेने वेळेवर उच्च रक्तदाबाचे निदान करून संदर्भित करण्याची सर्वतोपरी कार्यवाही व समुपदेशन केले होते.मातेच्या आणि तिच्या पतीच्या सुरुवातीच्या संदर्भास (Referral) नकार देण्याच्या भूमिकेमुळे घरगुती उपचार सुरू राहिले, ज्यानंतर प्रकृती बिघडल्याने ही घटना घडली आहे. – डॉ.प्रताप शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी,गडचिरोली
error: Content is protected !!