Home Breaking News सावली तालुक्यातील व्याहाड (खुर्द) येथे शेतात काम करताना मधमाशांच्या हल्ल्यात पतीचा मृत्यू...
सावली तालुक्यातील व्याहाड (खुर्द) येथे शेतात काम करताना मधमाशांच्या हल्ल्यात पतीचा मृत्यू ; पत्नी गंभीर जखमी
सुकदर्शन वृतांत
सावली : (दिनांक,30/08/2026 रविवार ) शेतात निंदणाचे काम करीत असताना मधमाशांच्या हल्ल्यात पतीचा मृत्यू,तर पत्नी जखमी झाल्याची घटना व्याहाड खुर्द येथील शेतात घडली.महिपाल कचरू येरमा वय,५५ वर्ष असे मृत शेतमजुराचे नाव असून त्यांची पत्नी शालू महिपाल येरमा वय,५० वर्ष जखमी झाली आहे.शालू यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महिपाल येरमा आणि त्यांची पत्नी शालू हे शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. महिपाल यांनी मनोहर डोंगरे यांची शेती ठेक्याने घेतली होती.सध्या खरीप हंगाम सुरू असून शेतातील रोवणीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे शेतात वाढलेले निंदण काढण्यासाठी दोघेही सकाळी नऊच्या सुमारास शेतात गेले होते.
दोघेही शेतात निंदण काढत असताना शेतालगतच्या झाडावर असलेल्या पोळ्यातील मधमाशांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला.मधमाशांनी मोठ्या संख्येने हल्ला केल्याने दोघांनीही तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मधमाशांपासून बचाव करण्यासाठी त्यांनी जवळच असलेल्या कालव्यातील पाण्यात डोके बुडवून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला.या दरम्यान महिपाल येरमा बेशुद्ध पडले.
शालू यांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली.त्यांचा आवाज ऐकून राजोली चक येथील एक व्यक्ती घटनास्थळी धावून आली. त्यानंतर शालू यांच्या घरच्यांशी मोबाइलवरून संपर्क साधून मुलांना घटनास्थळी बोलावण्यात आले. मुलांनी घटनास्थळी पोहोचून बेशुद्ध अवस्थेत असलेल्या वडिलांना तातडीने व्याहाड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.
महिपाल यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.पती-पत्नीवर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले.उपचारादरम्यान महिपाल यांचा मृत्यू झाला. शालू यांच्यावर उपचार सुरू आहेत.
खरीप हंगामातील कामाला गेलेल्या शेतकरी कुटुंबावर मधमाशांच्या हल्ल्यामुळे काळाचा घाला आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
error: Content is protected !!