Home Breaking News कोरची तालुक्यातील मसेली जवळील तीव्र वळणावर भीषण अपघातात एकाचा मृत्यू ; एक...
कोरची तालुक्यातील मसेली जवळील तीव्र वळणावर भीषण अपघातात एकाचा मृत्यू ; एक जण गंभीर जखमी.
📍१०८ रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने पिकअप वाहनातून रुग्णालयात हलविले.
सुकदर्शन वृतांत
कोरची : कोरची : भंडारा येथून कोरचीकडे येत असलेल्या एका दुचाकीचा मसेलीजवळील तीव्र वळणावर भीषण अपघात झाल्याची घटना रविवार, २८ जून रोजी दुपारी २:३० वाजताच्या सुमारास घडली. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन प्रथम दुभाजकाला (डिव्हायडर) आणि त्यानंतर थेट झाडाला जाऊन धडकले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला,
तर त्यांच्यासोबत प्रवास करणारा एक जण गंभीर जखमी झाला आहे. नितेश करेमुरे (वय ४५, रा. भंडारा) असे अपघातात मृत्यू झालेल्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाचे तर रामविलास लोधी (वय ३०, रा. मध्य प्रदेश) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
भंडारा येथील रहिवासी असलेले नितेश करेमुरे हे आपल्या दुचाकीने कोरचीकडे येत होते. कोरचीपासून अवघ्या ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या मसेली गावालगायतच्या तीव्र वळणावर अचानक त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले.नियंत्रण सुटल्याने दुचाकी वेगाने रस्त्यावरील डिव्हायडरवर आदळली आणि त्यानंतर बाजूला असलेल्या झाडावर जाऊन धडकली.
या भीषण अपघातात नितेश यांच्या डोक्याला अत्यंत गंभीर दुखापत झाली व मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. त्यांच्यासोबत असलेले रामविलास लोधी यांच्याही डोक्याला व खांद्याला गंभीर मार लागला.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने ‘१०८’ शासकीय रुग्णवाहिकेला संपर्क साधला.
रुग्णवाहिका पोहोचण्यासाठी सुमारे दोन तासांचा वेळ लागणार असल्याचे सांगण्यात आले. जखमींची गंभीर अवस्था पाहून मसेली येथील वाहनचालक संजू मसराम यांनी वेळ न गमावता स्वतःच्या पिकअप वाहनाची व्यवस्था केली. युवा कार्यकर्ते प्रशांत कराडे यांच्या मदतीने दोन्ही जखमींना तातडीने कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित बुद्धे यांनी जखमींवर तात्काळ उपचार सुरू केले, मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यानच नितेश करेमुरे यांची प्राणज्योत मालवली. गंभीर जखमी रामविलास यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मृत नितेश करेमुरे हे ट्रान्सपोर्ट व्यवसायाशी संबंधित होते. त्यांच्या मालकीचे दोन ते तीन ट्रक असून मिनी बाजारांसाठी विविध ठिकाणी मालवाहतूक करण्याचे काम ते करत असत.
सध्या कोरची येथे सुरू असलेल्या मिनी बाजाराचे चालक त्यांचे नातेवाईक आहेत. तेथे आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नितेश हे भंडाऱ्यावरून मोठ्या उत्साहाने कोरचीकडे येत होते.उद्दिष्टावर पोहोचण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली. या अपघाताचा पुढील तपास कोरची पोलीस करत आहेत.
error: Content is protected !!