Home Breaking News नक्षलवाद्यांनी जमिनीखाली लपवून ठेवलेला शस्त्र निर्मिती कारखाना गडचिरोली C – 60 आणि...
नक्षलवाद्यांनी जमिनीखाली लपवून ठेवलेला शस्त्र निर्मिती कारखाना गडचिरोली C – 60 आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) यांच्या संयुक्त कारवाईत उद्ध्वस्त.
सुकदर्शन वृतांत
गडचिरोली : जिल्ह्यातील नक्षलविरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील बालबेडा जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी जमिनीखाली लपवून ठेवलेला शस्त्रनिर्मिती कारखाना गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) यांच्या संयुक्त कारवाईत उद्ध्वस्त करण्यात आला.
या कारवाईत ५ ते ६ टन वजनाची लेथ मशीन, १५० क्लेमोर व बीजीएल पाईप्स, २२० बारा बोअर पाईप्स तसेच शस्त्रनिर्मितीसाठी वापरले जाणारे मोठ्या प्रमाणातील साहित्य जप्त करण्यात आले. दुर्गम भागातून हे साहित्य बाहेर काढणे अशक्य असल्याने ते घटनास्थळीच सुरक्षितपणे नष्ट करण्यात आले.
सुरक्षा दलांवर मोठे हल्ले घडवून आणणे,निवडणुका किंवा नक्षल सप्ताहाच्या काळात घातपात करणे आणि शस्त्रसाठा वाढविणे या उद्देशाने नक्षलवाद्यांनी हा गुप्त कारखाना उभारल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यापूर्वी २३ आणि २७ मे रोजी अशाच कारवायांमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर आता या कारवाईमुळे नक्षलवाद्यांच्या रसद व्यवस्थेला आणखी मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
बालबेडा जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी शस्त्रनिर्मितीचे साहित्य दडवून ठेवल्याची गोपनीय माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली २६ जून रोजी विशेष अभियान पथक (सी-६०), प्राणहिता पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) तसेच सीआरपीएफच्या जवानांच्या एकूण सहा तुकड्या शोध मोहिमेसाठी रवाना करण्यात आल्या.
२७ जून रोजी जवानांनी संशयित परिसराला वेढा घालून तपास सुरू केला. बीडीडीएसच्या पथकाने केलेल्या सखोल तपासणीत जमिनीखाली पुरलेला मोठा शस्त्रनिर्मिती साठा उघडकीस आला. यात ५ ते ६ टन वजनाची लेथ मशीन, १५० क्लेमोर व बीजीएल पाईप्स, २२० बारा बोअर पाईप्स, २० रायफल रॉड मेटल पट्ट्या आणि इतर साहित्य आढळून आले.अत्यंत दुर्गम व डोंगराळ भाग असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार संपूर्ण साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादाविरोधात सुरू असलेल्या सातत्यपूर्ण कारवायांमुळे नक्षल चळवळीचा प्रभाव दिवसेंदिवस कमी होत असल्याचे या कारवाईवरून स्पष्ट होत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या नेतृत्वाखाली अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा,अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी,
पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या देखरेखीखाली विशेष अभियान पथक, प्राणहिता, इंटेलिजन्स सेल, बीडीडीएस आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्तपणे पार पाडली.या धाडसी आणि यशस्वी कारवाईबद्दल संबंधित जवानांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.
error: Content is protected !!