Home Breaking News शेतकरी रोशन कुळे मुत्रपिंड विक्री प्रकरणात ब्रह्मपुरी येथील भाजप कार्यकर्ते दिवाकर निकुरे...
शेतकरी रोशन कुळे मुत्रपिंड विक्री प्रकरणात ब्रह्मपुरी येथील भाजप कार्यकर्ते दिवाकर निकुरे यांच्याविरुद्ध अवैध सावकारीचा गुन्हा दाखल.
सुकदर्शन वृतांत
नागभीड : नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील शेतकरी रोशन कुळे यांच्या आंतरराष्ट्रीय मुत्रपिंड विक्री प्रकरणाच्या तपासाला आणखी वेग आला असून, ब्रह्मपुरी येथील भाजप कार्यकर्ते तथा व्यावसायिक दिवाकर निकुरे यांच्याविरुद्ध अवैध सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
प्रकरणात आता पर्यंत सात अवैध सावकारांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.मुख्य आरोपी डॉ.रविंद्रपाल सिंग यांच्या शरणागतीनंतर तपास यंत्रणांनी फरार असलेल्या तामिळनाडूतील डॉ. राजरत्नम गोविंदस्वामी यांच्या शोधासाठी मोहीम अधिक तीव्र केली आहे.
रोशन कुळे यांनी सावकारांचे कर्ज फेडण्यासाठी कंबोडियामध्ये स्वतःचे मुत्रपिंड विकल्याची धक्कादायक बाब उघडकीस आल्यानंतर या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश झाला. सुरुवातीच्या तपासात ब्रह्मपुरी परिसरातील सहा अवैध सावकारांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती.
त्यानंतर आर्थिक व्यवहारांची सखोल छाननी करण्यात आली असता दिवाकर निकुरे आणि फिर्यादी रोशन कुळे यांच्यात सुमारे आठ लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले.
त्याआधारे निकुरे यांच्याविरुद्ध अवैध सावकारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा नोंद होताच निकुरे काही काळ फरार झाले होते. मात्र, त्यांनी न्यायालयात धाव घेत अंतरिम जामीन मिळविला आहे. पोलिसांनी त्यांना पुढील चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले असून, आर्थिक व्यवहारांचे स्वरूप आणि या प्रकरणातील त्यांची भूमिका याबाबत सविस्तर चौकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या प्रकरणातील प्रमुख आरोपी दिल्ली येथील डॉ. रविंद्रपाल सिंग यांनी ब्रह्मपुरी न्यायालयात शरणागती पत्करल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तपासासाठी त्यांची सखोल चौकशी आवश्यक असल्याने पोलिसांकडून त्यांना पोलिस कोठडीत देण्याची मागणी ब्रह्मपुरी न्यायालयात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक आयुष नोपानी यांनी दिली.
या रॅकेटमधील आणखी एक प्रमुख आरोपी तामिळनाडूतील त्रिची येथील डॉ. राजरत्नम गोविंदस्वामी अद्याप फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत आहे. राज्याबाहेरील तपास यंत्रणांशी समन्वय साधून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.
तपासादरम्यान देशातील विविध राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या अवैध अवयव तस्करीच्या जाळ्याचे धागेदोरे समोर येत असून, आर्थिक व्यवहार, दलालांची साखळी आणि रुग्णालयांशी संबंधित पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.नऊ पीडितांचे जबाब नोंदविले; कोलकात्यातील व्यक्तीचा शोध कायम
मुत्रपिंड विक्री प्रकरणाच्या तपासात आतापर्यंत मुत्रपिंड विक्री केलेल्या नऊ जणांना चंद्रपूर येथे बोलावून त्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. या पीडितांमध्ये उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक (बंगळुरू) आणि महाराष्ट्रातील नागरिकांचा समावेश आहे.
कोलकाता येथील एका व्यक्तीनेही मुत्रपिंड विकल्याचे निष्पन्न झाले असले, तरी त्याला अद्याप ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्याचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथक कार्यरत असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
error: Content is protected !!