Home Breaking News पश्चिम बंगालमधील भारत – बांगलादेश सीमेवर कर्तव्य बजावताना गडचिरोली चा BSF जवान...
पश्चिम बंगालमधील भारत – बांगलादेश सीमेवर कर्तव्य बजावताना गडचिरोली चा BSF जवान शहीद.
📍दहशतवाद्यांच्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाल्याने गडचिरोली जिल्ह्यावर शोककळा.
सुकदर्शन वृतांत
गडचिरोली : पश्चिम बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेवर कर्तव्य बजावताना कुरखेडा तालुक्यातील मरारटोला गावचे रहिवासी आणि सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) जवान सुरेश दुर्गू आंबडर वय,३५ वर्ष यांना २३ जुलै रोजी पश्चिम बंगालमधील भारत – बांगलादेश सीमेवर कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त झाली.
दहशतवाद्यांच्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाल्याने गडचिरोली जिल्ह्यावर शोककळा पसरली असून त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरी, तस्करी आणि इतर बेकायदेशीर हालचाली रोखण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडून सध्या विशेष मोहीम सुरू आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उभारण्यात आलेले स्मार्ट कुंपण, रडार यंत्रणा, तसेच सुंदरबनसारख्या दुर्गम भागात स्पीड बोटी आणि तरंगत्या सीमा चौक्यांद्वारे गस्त घातली जात आहे. या मोहिमेदरम्यान झालेल्या हल्ल्यात सुरेश आंबडर यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले.
सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सुरेश आंबडर यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सीमा सुरक्षा दलात प्रवेश मिळवला होता. अवघ्या सुमारे ३०० लोकसंख्येच्या मरारटोला गावातून देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी कठोर परिश्रमांच्या बळावर गणवेश परिधान केला.
कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि देशभक्ती यामुळे ते गावातील तरुणांसाठी प्रेरणास्थान बनले होते. त्यांच्या पश्चात आई-वडील,भाऊ,पत्नी आणि एक लहान मुलगी असा परिवार आहे. कुटुंबाच्या आधारस्तंभाचे अकाली निधन झाल्याने त्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.वीर जवानाचे पार्थिव शुक्रवारी सायंकाळपर्यंत मूळ गावी आणण्यात येणार असून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
“ गृह मंत्रालयाकडून या संदर्भात माहिती प्राप्त झाली आहे. जिल्हा प्रशासन वीर जवान सुरेश आंबडर यांच्या कुटुंबाच्या सातत्याने संपर्कात आहे.उद्या सायंकाळपर्यंत त्यांचे पार्थिव मूळ गावी पोहोचेल.देशाच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेले बलिदान सदैव स्मरणात राहील. ” – अविश्यांत पंडा,जिल्हाधिकारी, गडचिरोली
error: Content is protected !!