Home Breaking News कर्जमाफीसाठी राजुरा तहसील कार्यालयात बैलावर स्वार होत तहसीलदार कार्यालयात प्रवेश करून शेतकऱ्याने ...
कर्जमाफीसाठी राजुरा तहसील कार्यालयात बैलावर स्वार होत तहसीलदार कार्यालयात प्रवेश करून शेतकऱ्याने अनोख्या पद्धतीने केले आंदोलन.
सुकदर्शन वृतांत
राजुरा : कर्जमाफीच्या मागणीसाठी एका कर्जबाजारी शेतकऱ्याने राजुरा तहसील कार्यालयात अनोख्या पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. बैलावर स्वार होत थेट तहसीलदार कार्यालयात प्रवेश करून या शेतकऱ्याने ” कर्जमाफी झालीच पाहिजे ” अशी मागणी केली. या आगळ्यावेगळ्या आंदोलनाची परिसरात दिवसभर चर्चा रंगली.
राजुरा तालुक्यासह परिसरातील अनेक भागांत अपुऱ्या पावसामुळे शेती संकटात सापडली आहे.पावसाअभावी पिकांचे नुकसान होत असून अनेक शेतकऱ्यांना नापिकीचा सामना करावा लागत आहे.उत्पादन खर्च वाढत असताना उत्पन्नात घट झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अनेकांनी पीककर्ज आणि इतर कर्जे घेतली असून त्यांची परतफेड करणे कठीण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर एका शेतकऱ्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखा मार्ग अवलंबला.बैलावर बसून तो थेट राजुरा तहसील कार्यालयात पोहोचला. कार्यालय परिसरात प्रवेश करताच उपस्थित नागरिक आणि कर्मचारी काही काळ अचंबित झाले.त्यानंतर शेतकऱ्याने कर्जमाफीच्या मागणीसाठी घोषणाबाजी करत आपली व्यथा मांडली.
शेतकऱ्याचे म्हणणे आहे की, सातत्याने होणारी नापिकी,वाढते उत्पादन खर्च आणि कर्जाचा वाढता बोजा यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. अनेक शेतकरी आर्थिक संकटामुळे टोकाचे निर्णय घेत असल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अशा परिस्थितीत सरकारने सर्वसमावेशक कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,अशी त्याची मागणी आहे.
या अनोख्या आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित नागरिकांनीही शेतकऱ्याच्या मागण्यांबाबत सहानुभूती व्यक्त केली. प्रशासनाने शेतकऱ्याची भूमिका ऐकून घेतली असून त्याचे निवेदन शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, शेतकऱ्यांच्या वाढत्या आर्थिक अडचणी आणि रखडलेल्या कर्जमाफीच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
शासनाने या प्रश्नावर लवकर निर्णय घेऊन संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी विविध शेतकरी संघटनांकडूनही केली जात आहे.आंदोलन,मोर्चे आणि निवेदने हा नेहमीचा मार्ग असताना संबंधित शेतकऱ्याने बैलावर बसून तहसील कार्यालयात प्रवेश करण्याचा मार्ग निवडला.
ग्रामीण जीवनाचे प्रतीक असलेल्या बैलाच्या माध्यमातून शेतीची बिकट अवस्था आणि शेतकऱ्यांची व्यथा शासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा परिसरात रंगली.
error: Content is protected !!