Thursday, July 30, 2026
Home Chandrapur आंतरराष्ट्रीय परिषद ” आयकॉन – २०२६ ” मध्ये डॉ. अरविंद जनार्दन मुंगोले...

आंतरराष्ट्रीय परिषद ” आयकॉन – २०२६ ” मध्ये डॉ. अरविंद जनार्दन मुंगोले यांना ” एमिनेंट सायंटिस्ट अवॉर्ड ” प्रदान.

0
30

आंतरराष्ट्रीय परिषद ” आयकॉन – २०२६ ” मध्ये डॉ. अरविंद जनार्दन मुंगोले यांना ” एमिनेंट सायंटिस्ट अवॉर्ड ” प्रदान.

सुकदर्शन वृतांत 
ब्रम्हपुरी : नेवजाबाई भैय्या हितकारिणी शिक्षण संस्थेद्वारे संचालित नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. अरविंद जे. मुंगोले यांना “आयकॉन-२०२६” (International Conference on Innovative Trends in Climate-Resilient and Adaptive Agriculture) या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये वनस्पतिशास्त्र व त्यास संलग्न शाखांमधील संशोधन क्षेत्रातील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य आणि उल्लेखनीय योगदानाबद्दल ” एमिनेंट सायंटिस्ट अवॉर्ड ” प्रदान करून गौरविण्यात आले.
या मानाच्या पुरस्कारामुळे नेवजाबाई भैय्या हितकारिणी शिक्षण संस्था तसेच नेवजाबाई हितकारिणी विज्ञान महाविद्यालयाच्या शैक्षणिक, संशोधन व वैज्ञानिक कार्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून संस्थेच्या व महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
ही आंतरराष्ट्रीय परिषद दि. १८ ते २० जुलै २०२६ या कालावधीत पार पडली. या परिषदेचे आयोजन सोसायटी ऑफ अॅग्रिकल्चर रिसर्च अँड सोशल डेव्हलपमेंट (भारत), सदर्न फेडरल युनिव्हर्सिटी, रोस्तोव-ऑन-डॉन (रशिया) आणि हार्वेस्ट हार्मोनियस (अमेरिका) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
ज्ञानाची देवाणघेवाण, संशोधनातील सहकार्य आणि नवसंशोधनाला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित या परिषदेत ४०० हून अधिक संशोधक, वैज्ञानिक, प्राध्यापक, संशोधन विद्यार्थी, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योजक तसेच विविध देशांतील प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला.
डॉ. मुंगोले यांना यापूर्वीही यंग सायंटिस्ट अवॉर्ड, डिस्टिंग्विश्ड सायंटिस्ट अवॉर्ड तसेच बेस्ट पेपर प्रेझेंटेशन अवॉर्ड यांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या नावे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधन नियतकालिकांमध्ये ६० हून अधिक संशोधन लेख प्रकाशित असून ७ पेटंट्स तसेच १० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 
हा सन्मान स्वीकारल्यानंतर डॉ. अरविंद मुंगोले यांनी या यशाचे श्रेय आपल्या आई-वडिलांच्या आशीर्वादाला, कुटुंबीयांच्या सातत्यपूर्ण सहकार्य व प्रोत्साहनाला, संस्थेच्या व्यवस्थापनाला, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, संशोधक तसेच विद्यार्थ्यांच्या पाठबळाला दिले.
हा सन्मान सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचा, प्रेरणेचा आणि विश्वासाचा परिपाक असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी आपल्या आई-वडिलांचे, कुटुंबातील सर्व सदस्यांचे, सहकाऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे तसेच संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले. भविष्यातही शिक्षण, संशोधन आणि वैज्ञानिक नवोपक्रमाच्या क्षेत्रात पूर्ण समर्पणाने कार्य करत राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या उल्लेखनीय यशाबद्दल नेवजाबाई भैय्या हितकारिणी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ. स्नेहलता भैय्या, उपाध्यक्ष ॲड.श्री.प्रकाश भैय्या, सचिव श्री.अशोक भैय्या, महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी डॉ. अरविंद मुंगोले यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी शैक्षणिक, संशोधन व वैज्ञानिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!