Thursday, July 30, 2026
Home Breaking News एटापल्ली तालुक्यातील दुर्गम कोईंदूळ येथे रस्ता नसल्याने गर्भवतीचा स्ट्रेचर वरून 1.5 कि.मी...

एटापल्ली तालुक्यातील दुर्गम कोईंदूळ येथे रस्ता नसल्याने गर्भवतीचा स्ट्रेचर वरून 1.5 कि.मी जीवघेणा प्रवास

0
15

एटापल्ली तालुक्यातील दुर्गम कोईंदूळ येथे रस्ता नसल्याने गर्भवतीचा स्ट्रेचर वरून 1.5 कि.मी जीवघेणा प्रवास

सुकदर्शन वृतांत 
एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील दुर्गम कोईंदूळ गावात प्रसूती वेदना सुरू झालेल्या गर्भवती महिलेला रुग्णवाहिके पर्यंत पोहोचविण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना तब्बल दीड कि.मी.स्ट्रेचर वरून नेण्याची वेळ आली.
पक्का रस्ता आणि वाहतुकीची सुविधा नसल्यामुळे घडलेल्या या घटनेने दुर्गम भागातील आरोग्य सुविधांची मर्यादा पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. मात्र, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे संबंधित महिलेची सुरक्षित प्रसूती झाली असून माता आणि नवजात बालिका दोघींची प्रकृती स्थिर आहे.
कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील कोईंदूळ गावातील पुष्पा सुनील परसा वय,३० वर्ष यांना सोमवारी सकाळी प्रसूतीवेदना सुरू झाल्यानंतर आरोग्य पथक तातडीने गावात दाखल झाले.
गावापर्यंत पक्का रस्ता नसल्याने तसेच वाटेत नाला असल्यामुळे रुग्णवाहिका थेट पोहोचू शकली नाही.परिणामी आरोग्य कर्मचाऱ्यांनी पुष्पा परसा यांना स्ट्रेचरवरून दीड किलोमीटर अंतर पार करून रुग्णवाहिकेपर्यंत आणले.
त्यानंतर त्यांना कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे त्यांची सुखरूप प्रसूती झाली आणि त्यांनी एका मुलीला जन्म दिला. पुढील उपचारासाठी त्यांना गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयात हलविण्यात आले असून माता आणि बालिका दोघींची प्रकृती चांगली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
ही घटना दुर्गम भागातील पायाभूत सुविधांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ठरली आहे.एटापल्ली तालुका लोहखनिज प्रकल्पांमुळे आणि मोठ्या महसुलामुळे चर्चेत असताना.
याच भागातील नागरिकांना मूलभूत रस्त्याअभावी अशा संकटांचा सामना करावा लागत असल्याचे वास्तव पुन्हा समोर आले आहे. यापूर्वी गोटाटोला येथेही गर्भवती महिलेला स्ट्रेचरवरून नेण्याची वेळ आली होती. त्यानंतरही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचे कोईंदूळमधील घटनेवरून दिसून येते.
पाच नाले ओलांडल्याशिवाय संपर्क नाही कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतील कोईंदूळ, रेकनार, गडदापल्ली आणि गुंमडी ही चार आदिवासीबहुल गावे पावसाळ्यात अक्षरशः संपर्कविहीन होतात.
कसनसूर किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी ग्रामस्थांना दोन मोठे आणि तीन लहान असे एकूण पाच नाले पार करावे लागतात. मुसळधार पावसात हे नाले दुथडी भरून वाहू लागल्याने या गावांचा बाहेरील जगाशी संपर्क तुटतो आणि आरोग्य सेवांसह दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!