Home Gadchiroli पोटनिवडणुकीत भाजप,राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार आणि काँग्रेसचा प्रत्येकी एका जागेवर विजय.
पोटनिवडणुकीत भाजप,राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार आणि काँग्रेसचा प्रत्येकी एका जागेवर विजय.
सुकदर्शन वृतांत
गडचिरोली : नगर परिषदेच्या एक व नगर पंचायतीच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार आणि काँग्रेस पक्षाने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला.नगर पंचायतीच्या दोन जागा भाजपने गमावल्याने पक्षाने पक्षाच्या स्थानिक नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गडचिरोली नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ९(अ), कुरखेडा नगर पंचायतीच्या प्रभाग क्रमांक आणि अहेरी नगर पंचायतीच्या प्रभाग क्रमांक साठी शनिवारी(ता.२०) पोटनिवडणूक घेण्यात आली.आज तिन्ही निवडणुकांची मतमोजणी झाली. गडचिरोली नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ९(अ) च्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अंकुश नैताम विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार विनोद भांडेकर यांचा २६४ मतांनी पराभव केला.
नैताम यांना १ हजार ३७१, तर भांडेकर यांना १ हजार १०७ मते मिळाली. ही जागा यापूर्वी भाजपचे शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे यांनी जिंकली होती.परंतु त्यांचे अपघाती निधन झाल्याने पोटनिवडणूक घेण्यात आली. ही जागा ओबीसी(सर्वसाधारण) प्रवर्गासाठी राखीव होती. विजयानंतर नगराध्यक्ष अॅड.प्रणोती निंबोरकर आणि भाजप नेत्यांनी अंकुश नैताम यांचे अभिनंदन केले.
अहेरी नगर पंचायतीच्या प्रभाग क्रमांक ९ साठी झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार संजना हनुमंतू मडावी १० मतांनी विजयी झाल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी भाजपच्या उमेदवार माया येलूरकर यांचा पराभव केला. संजना मडावी यांना १९७, तर माया येलूरकर यांना १८७ मते मिळाली.
ही जागा अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी त्यांचे अभिनंदन केले. सार्वत्रिक निवडणुकीत ही जागा आधी भाजपने जिंकली होती. परंतु आता राष्ट्रवादी(शपा) काँग्रेसने तेथे कब्जा केला.
कुरखेडा नगर पंचायतीच्या अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव असलेल्या प्रभाग क्रमांक १६ च्या पोटनिवडणुकीत शिवसेना(उबाठा) समर्थित काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा उईके निवडून आल्या. त्यांनी भाजपच्या उमेदवार निलीमा हारामी यांना १७ मतांनी पराभूत केले. एकूण २१७ मतांपैकी उईके यांना ११७, तर हारामी यांना ९९ मते मिळाली. १ मत ‘नोटा’ ला मिळाले.
विजयानंतर आ.रामदास मसराम, उबाठाचे तालुकाध्यक्ष आशिष काळे काँग्रेस नेते जयंत हरडे, आशाताई तुलावी यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. सार्वत्रिक निवडणुकीत ही जागा भाजपने जिंकली होती. परंतु आता तेथे काँग्रेसने कब्जा केला आहे.
error: Content is protected !!