Home Chandrapur मुल तालुक्यातील सर्व शाळांची तपासणी करून अहवाल जनतेसमोर प्रसिद्ध करा. – युवक...
मुल तालुक्यातील सर्व शाळांची तपासणी करून अहवाल जनतेसमोर प्रसिद्ध करा. – युवक काँग्रेसची मागणी
सुकदर्शन वृतांत
मुल : (राजेंद्र वाढई – उपसंपादक) मुल तालुक्यातील शासकीय, अनुदानित तसेच इतर सर्व शाळांमधील शैक्षणिक व भौतिक सुविधांची प्रत्यक्ष तपासणी करून त्याचा सविस्तर अहवाल जनतेसमोर प्रसिद्ध करण्यात यावा,अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तालुक्यातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक व मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याच्या तक्रारी नागरिक व पालकांकडून समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व शाळांची प्रत्यक्ष पाहणी करून शाळेच्या इमारती व वर्गखोल्यांची स्थिती, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, शैक्षणिक साहित्य, शिक्षकांची उपस्थिती, विद्यार्थ्यांची उपस्थिती व शैक्षणिक प्रगती यांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच शाळांमधील संगणक, वीज, इंटरनेट, इतर शैक्षणिक साधने, मध्यान्ह भोजनाची गुणवत्ता, विद्यार्थ्यांची सुरक्षितता, शासनाकडून मिळणाऱ्या निधीचा योग्य वापर तसेच विद्यार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळतो की नाही, याचीही पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी युवक काँग्रेसने केली आहे.
तपासणीदरम्यान आढळून येणाऱ्या त्रुटी व कमतरतांवर तातडीने उपाययोजना करून त्याचा सविस्तर अहवाल जनतेसमोर प्रसिद्ध करावा. तसेच अनियमितता किंवा हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर मागणीची एका आठवड्याच्या आत दखल घेऊन कार्यवाही न झाल्यास विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या हितासाठी तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल तसेच आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात येईल, असा इशारा युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.निवेदन देताना तालुकाध्यक्ष गुरूदास गुरनुले
युवक कांग्रेस तालुकाध्यक्ष पवन निलमवार, इंटक चे अध्यक्ष दत्तात्रय समर्थ,शहराध्यक्ष मिथुन सिंग पटवा, अनुसूचित जाती कार्याध्यक्ष आकाश दहिवले, चेतन कामडी, संदीप चिंचोलकर, लहू कडस्कर,रवि तेलसे,तथा युवक काँग्रेसचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
error: Content is protected !!