Home Breaking News गडचिरोली – चामोर्शी मार्गावरील कुनघाडा फाट्याजवळ झालेल्या दुचाकी अपघातात युवकाचा जागीच मृत्यू.
गडचिरोली – चामोर्शी मार्गावरील कुनघाडा फाट्याजवळ झालेल्या दुचाकी अपघातात युवकाचा जागीच मृत्यू.
सुकदर्शन वृतांत
चामोर्शी : भामरागड तालुक्यातील जुव्वी येथील रहिवासी संजू मालू कोरसामी वय,30 वर्ष यांचा शुक्रवारी (दि.19 जून) सकाळी गडचिरोली – चामोर्शी मार्गावरील कुनघाडा फाट्याजवळ झालेल्या दुचाकी अपघातात जागीच मृत्यू झाला.या दुर्दैवी घटनेमुळे जुव्वी गावासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,संजू कोरसामी आपल्या पत्नीला प्रसूतीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय,गडचिरोली येथे दाखल केले होते. गुरुवारीच त्यांच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. आई आणि नवजात बालिकेची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना रुग्णालयातच उपचारासाठी ठेवण्यात आले होते.
शुक्रवारी सकाळी संजू कोरसामी हे दुचाकी क्रमांक. MH.33 AF 0144 ने गडचिरोली कडून आपल्या मूळ गावी जुव्वीकडे जात असताना चामोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुनघाडा फाट्याजवळ रस्त्याचा अंदाज न आल्याने त्यांची दुचाकी अपघातग्रस्त झाली.या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.त्यांना ग्रामीण रुग्णालय,चामोर्शी येथे नेण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मृत घोषित केले.
संजू कोरसामी हे अत्यंत शांत, प्रामाणिक आणि मनमिळावू स्वभावाचे असल्याने त्यांच्या अकाली निधनाने गावात शोककळा पसरली आहे.नवजात मुलीच्या जन्माचा आनंद साजरा करण्याआधीच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.या प्रकरणी मालू बंडे कोरसामी वय,65 रा.जुव्वी, ता.भामरागड यांच्या तोंडी फिर्यादीवरून चामोर्शी पोलीस ठाण्यात मर्ग क्रमांक 39/2026 कलम 194 बी.एन.एस.एस. 2023 अन्वये नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोउपनि शाहू दंडे करीत आहेत.
“ कालच मुलगी जन्माला आली आणि आज तिच्या वडिलांचे छत्र हरपले ” या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरातून कोरसामी कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करण्यात येत आहेत.
error: Content is protected !!